कर्जतमधील अविज विलेज फार्महाऊसवर पोलिसांची धाड; 34 जणांवर गुन्हे दाखल
। नेरळ । वार्ताहर ।
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कर्जत तालुका पर्यटकांसाठी पर्वणीच पावसाळी पर्यटनासाठी पसंती मिळत आहे. तालुक्यात फॉर्म हाऊस संस्कृती उदयास आलेली असून, पर्यटकांचा ओढा जास्त असतो. शनिवार व रविवार या वीकेंड सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. कोव्हिड-19 संसर्गचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रायगड जिल्हाधिकारी यांचे आदेश जारी करण्यात असताना, त्या आदेशाचे पर्यटकांकडून उल्लंघन करण्यात आले आहे. कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथील अव्हिज व्हिलेज या फॉम हाऊसमध्ये मुंबईतील उच्चभ्रू वस्तीतील पर्यटक पार्टी करण्यासाठी आले असताना, कर्जत पोलिसांनी धाड टाकून एकूण 34 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
रायगड पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तरीदेखील नियमांचे पालन न करणार्या वाहनांची तपासणी करून उल्लंघन करणार्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला जात आहे.
कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या परवानगीने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिपान सोनावणे यांनी कर्जत पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांना घेऊन मौजे वंजारवाडी येथील अविज व्हिलेज फॉर्म हाऊस रेस्टॉरंटमध्ये जाऊन धाड टाकली असता तेथे भरपूर लोकांची गर्दी असलेली आढळून आली. यात मुंबईतील उच्चभ्रू वस्तीतील एकूण 34 तरूण-तरुणीचा समावेश असून त्यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिपान सोनावणे हे करीत आहेत. कर्जत पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे तालुक्यातील फॉर्म हाऊस, रेस्टॉरंट मालकांचे धाबे दणाणले आहेत.