दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी मदत; रोटरी क्लबतर्फे सायकल वाटप
| चणेरा | प्रतिनिधी |
ग्रामीण दुर्गम भागातील शाळा व महाविद्यालये टिकली पाहिजेत. उपेक्षित सामान्य कुटुंबातील विद्यार्थी याठिकाणी ज्ञानार्जन करतात, तसेच मोठे होण्याचे स्वप्न देखील बघतात. त्या विद्यार्थ्यांच्या पंखाना बळ देण्याचे काम करायला हवे. त्यातून राज्य व देशाच्या विविध क्षेत्रात विद्यार्थी चमकतील, असा आशावाद रोटरी क्लब ऑफ रोहाचे अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांनी व्यक्त केला आहे. तसेच, क्लबच्या माध्यमातून दुर्गम भागातील शाळा व विद्यार्थ्यांसाठी भरीव मदत करण्याची व्यापक तरतूद करणार असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली. रोटरी क्लब ऑफ रोहाच्या माध्यमातून व प्रेस फ्रेंड ब ग्रुपच्या प्रयत्नातून म्हसाडी, बारपे व महागांव विद्यालयातील विद्यार्थ्यांना शुक्रवारी (दि.14) सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
रोटरी क्लब ऑफ रोहा यांच्या माध्यमातून व प्रेस फ्रेंड ग्रुप यांच्या प्रयत्नातून रोहा तालुक्यातील कुणबी समाज विद्यालय म्हसाडी, तळा तालुक्यातील बारपे शाळा, महागांव येथील वरदायीनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. प्रारंभी म्हसाडी विद्यालयातील 4 विद्यार्थ्यांना सायकल वाटप केल्या. यावेळी अध्यक्ष नारायण पवार यांनी सांगितले की, म्हसाडी विद्यालय अत्यंत जिकरीने सुरु आहे. याठिकाणी आदिवासी, ठाकूर, कुणबी समाजातील विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. येथून शिकून गेलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात नावलौकिक कमावत आहेत. तसेच, विविध संस्था व रोटरी क्लबने दिलेली मदत अनमोल आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांनतर सामाजिक कार्यकर्ते अमित घाग यांनी, दुर्गम भागातील शाळा व विद्यार्थ्यांना आधार देण्याची गरज आहे. त्या दृष्टीने आपणही नेहमीच प्रयत्नशील असतो. यापुढे शैक्षणिक क्षेत्रात मदत मिळविण्यासाठी अधिक प्रयत्न करू, असे सांगितले.
प्रेस फ्रेंड ग्रुप अनेक दानत लोकांना शोधत असतो. त्यांच्याकडून शाळा व विद्यार्थ्यांना मदत दिली जाते. आज रोटरी क्लब ऑफ रोहा संस्थेने पुढाकार घेत विद्यार्थ्यांना सायकली दिल्याचे समाधान आहे, असे सांगत राजेंद्र जाधव यांनी आपल्या कविता, सामाजिक शैलीतून मुलांशी संवाद साधला. माजी विद्यार्थी जितेंद्र जाधव यांनी शाळेच्या जुन्या आठवणी सांगत सर्व मित्रांच्या सहकार्यातून माझ्या शाळेला, विद्यार्थ्यांना मदत मिळविता आली. त्यातून शाळेचे ऋण व्यक्त करतो, असे सांगितले. यावेळी बारपे शाळेला 3 सायकली, वरदायनी विद्यालयाला 7 सायकली, अशा एकूण 14 सायकलींचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला रोटरी क्लब अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते आप्पा देशमुख, अमित घाग, रोटरीचे सचिव जयदेव पवार, खजिनदार भूषण लुमण, सतीश महाडीक, विक्रम जैन, डॉ. सुभाष म्हस्के, आशिष दळवी, राजेंद्र जाधव, नारायण पवार, लक्ष्मण साळवी, जनार्दन ढेबे, महेंद्र मोरे, रवींद्र कान्हेकर, जितेंद्र जाधव, समिधा आष्टीवकर, निलम सावंत, नंदकुमार बामुगडे व ग्रामस्थ, शिक्षकवृंद उपस्थित होते.







