गरिबांची मांडली थट्टा ! धान्य योजनेच्या नावाखाली सडके धान्य

भाजपकडून मुरुड तहसीलदारांकडे तक्रार

| आगरदांडा | प्रतिनिधी |

पंतप्रधान मोफत धान्य योजनेंतर्ग मुरुड तालुक्यात निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वाटप करण्यात येत असून, रास्त भाव धान्य दुकानांतून सरकारतर्फे गरिबांना दिले जाणारे हे रेशनचे धान्य निकृष्ट दर्जाचे आणि सडलेल्या अवस्थेत आहे, अशी तक्रार भाजप तालुका उपाध्यक्ष महेश मानकर यांनी तहसीलदार रोहन शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सडक्या धान्याचे वाटप थांबवा आणि गरिबांची चेष्टा बंद करा, अशी मागणी त्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.


महेश मानकर यांनी तहसीलदार रोहन शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून रेशन दुकानांमधून चांगल्या प्रतीचे धान्य नागरिकांना मिळेल, याची काळजी सरकारने घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सार्वजनिक वितरण माध्यमातून वितरित होणारे धान्य खरेदी करण्यापासून ते साठा करणे, रेशन दुकानात पुरवठा करणे, तसेच हे धान्य शिधापत्रिकाधारकांना देणे या पातळ्यांवर धान्याची गुणवत्ता तपासली पाहिजे, अशी मागणी मानकर यांनी केली. मुरुड तालुक्यातील सर्वच रास्त भाव दुकानांमध्ये सडके आळ्या असलेले धान्य कंत्राटी कामगारांकडून साफ करुन वितरित होत असून, जनेतच्या आरोग्याचा गंभीर निर्माण झाला असल्याची भीती व्यक्त करुन, सर्वत्र तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच भ्रष्टाचाराची कीड ठेचल्याशिवाय भाजप शांत बसणार नसल्याचे मानकर म्हणोल.

सदरचे निवेदन तहसीलदार रोहन शिंदे याना देते वेळी मुरुड तालुका भाजप अध्यक्ष महेंद्र चौलकर, उपाध्यक्ष महेश मानकर, उपाध्यक्ष स्वप्नील चव्हाण, मुरुड शहर अध्यक्ष उमेश माळी, संघटन सरचिटणीस प्रवीण बैकर, सर चिटणीस नरेश अध्यक्ष समीर शिंदे, शहर चिटणीस अभिजित पालवणकर, संदीप घरत, प्रवीण भाटकर आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोदामात उंदीर, घुशी, कबुतरांचा वावर
तहसील कार्यालयाकडून कारवाई होत नाही, म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी गोदामांची पाहणी केली असता भयावहन चित्र समोर आले. या गोदामामध्ये कबुतरांनी घरटे बनवले असून, काही कबुतरे मृत आढळून आली आहेत. 2020 व 2021 चा तांदूळ गोदामात असून, हा तांदूळ आळ्या पडलेल्या व निकृष्ट दर्जाचा तांदूळ साफ करून तोच तांदूळ पुन्हा रास्त भाव दुकानांमध्ये पाठवला जात आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा मोठा गंभीर प्रश्‍न निर्माण होणार आहे. काही ठिकाणी गोदामामध्ये उंदीर, घुशी मृत अवस्थेत आढळून आलेल्या आहेत. गोडाऊन रिपेअरिंगचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. धान्य सुरक्षित ठेवण्यात निष्काळजीपणा होत असल्याची बाबसुद्धा समोर आणण्यात आली आहे.

कारवाई नाहीच
यापूर्वी मुरुड तहसीलदारांना दि. 25-10-2022 रोजी भाजप उपाध्यक्ष स्वप्नील चव्हाण यांनी निवेदन देऊन सदरची परिस्थिती समोर आणली आहे. परंतु, मुरुड तहसील कार्यालयाकडून कोणतीही उपायययोजना करण्यात आली नाही. नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

भाजप पक्षाच्या वतीने जे निवेदन दिले आहे त्या संदर्भात चौकशी करणार असुन चौकशीत चुकीचं आढळ्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

रोहन शिंदे, तहसीलदार, मुरुड

नागरिकांच्या आरोग्याशी थट्टा वेळीच थांबावी. दरम्यान, चांगले अन्न वितरित करून तालुक्यातील नागरिकांना दिलासा द्यावा.

महेश मानकर, तालुका उपाध्यक्ष, भाजप

जुन्यापैकी एखाद-दोन गोणी खराब असू शकतील. सर्वच गोणी खराब असतील तर तालुक्यातील 17 हजार 275 रेशनकार्डधारकांनी आवाज उठविला असता. रेशन दुकानात तांदूळ खराब मिळतात याची कुठेही तक्रार नाही आहे. तरीही सोमवारी गोडाऊनची तपासणी केली जाईल.

छाया वरसोलकर, तालुका पुरवठा अधिकारी
Exit mobile version