रास्तभाव धान्य दुकानदाराकडून आदिवासींना अळ्या, लेंडीयुक्त धान्य वाटप
| पाली | प्रतिनिधी |
शासनामार्फत देण्यात येणाऱ्या ज्या धान्यावर आदिवासी, सर्वसामान्य जनतेचे पोट भरते, तेच धान्य आता सर्वसामान्यांसाठी जीवघेणे ठरते आहे. वाघोशी विभागातील रेशनिंगधारक नागरिकांना मिळणाऱ्या रेशनिंगच्या धान्यात जिवंत आल्या आणि उंदीर व पालीच्या लेंड्या सापडल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
वाघोशी विभागातील रास्तभाव धान्याचे दुकान कुंभारघर येथे आहे. या विभागात विशेषतः बहुतांश प्रमाणात आदिवासी वस्त्या आहेत. या आदिवासी नागरिकांचे जगण्याचे एकमेव साधन म्हणजे शासनाकडून रास्तभाव धान्य दुकानावर मिळणार शिधा. मात्र, रास्तभाव धान दुकानदाराकडून नागरिकांना अक्षरशः अळ्या व लेंडीयुक्त धान्य वितरित करण्यात येत असल्याची बाब नुकतीच उघडकीस आली आहे. काही आदिवासी वृद्ध महिला रेशनिंगचा शिधा घरी घेऊन आल्यानंतर त्या धान्यात अळ्या व लेंड्या असल्याचे निदर्शनास आले. डोळ्यांनी कमी दिसू येणाऱ्या वृद्ध आदिवासी महिलांनी हे धान्य शिजवून आपल्या कुटुंबासहीत खाल्ले असते तर त्यांना डायरीयासारख्या अनेक आजरांना बळी पडावे लागले असते. आणि शासनाचा स्वस्तातला शिधा नागरिकांना महाग पडला असता. याबाबत सामाजिक कार्यकर्ते व ऑल इंडिया पँथरचे नरेश गायकवाड यांनी सदरची बाब सुधागड तहसीलदार व पुरवठा निरीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत नरेश गायकवाड यांना तहसील कार्यालयाच्या आवारात याविरोधात आंदोलनदेखील केले.
सर्वसामान्य व आदिवासी नागरिकांना अळ्या व लेंडीयुक्त धान्य वितरित करून शासन त्यांची चेष्ठा करीत आहे. असे वारंवार होत असूनदेखील तहसीलदार यांच्याकडून केवळ आश्वासित केल्याचे पत्र देऊन संबंधित बेजबाबदार रेशनिंग दुकानदार व अधिकारी, गोदाम व्यवस्थापक यांना पाठीशी घालत असल्याचे निदर्शनास येते.
नरेश गायकवाड,
ऑल इंडिया पँथर सेना रायगड
शासनाकडून मिळणारे रेशनिंगचे धान्य निकृष्ट दर्जाचे किंवा खराब असेल तर ते रेशनिंग दुकानदाराने वितरित करू नये. असे धान्य आल्यास ते परत करावे. नागरिकांना चांगले व दर्जेदार धान्य देणे हे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे असे खराब धान्य रेशनिंग दुकानदार वितरित करीत असेल तर ते चुकीचे आहे. याबाबत संबंधित तहसीलदार योग्य ती कार्यवाही करावी.
दिपाली ब्राम्हणकर,
एडीएसओ रायगड







