राजधानी दिल्लीत मोठा राजकीय संघर्ष
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजत असतानाच, राजधानी नवी दिल्लीत मोठा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. मतदार याद्यांमधील गोंधळाविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाला केंद्रीय निवडणूक आयोगाने भेटण्यास स्पष्टपणे नकार दिल्याने संतप्त नेत्यांनी आयोगाच्या कार्यालयातच ठिय्या दिला.
मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात तक्रार करण्यासाठी मनेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे शिष्टमंडळ सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले. या शिष्टमंडळात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यासह अतुल लोंढे, राजीव झा यांचा समावेश होता.
शिष्टमंडळातील सर्व नेत आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी कार्यालयात गेले असता, अधिकाऱ्यांनी सर्वां भेट देण्यास नकार दिला. केवळ दोन नेत्यांना भेटणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, जोपर्यंत आमच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन आयोगाचे अधिकारी भेट घेत नाहीत, तोपर्यंत आम्ही कार्यालयातून बाहेर पडणार नाही, अशी ठाम भूमिका घेत सर्वांनी एकत्रितपणे ठिय्या आंदोलन सुरू केले. भेट द्यायची असेल, केवळ दोघांना नाही, तर सर्वांना भेट द्या, अशी मागणी अनिल देसाई यांनी केली. दरम्यान, शिष्टमंडळाने पुकारलेल्या ठिय्यामुळे दिल्लीत मोठा राजकीय तणाव निर्माण झाला आहे.







