खरेदीला अल्प प्रतिसाद; खरेदीवर 50 टक्के परिणाम
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
दिवाळीनंतर आवास येथील नागेश्वरची यात्रा मंगळवारी सुरू झाली. या यात्रेवर पावसाचे सावट पडल्याचे बोलले जात आहे. वेगवेगळ्या प्रकारची दुकाने असतानादेखील खरेदीला अल्प प्रतिसाद मिळाला. खरेदीवर 50 टक्के परिणाम झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
कार्तिक शुध्द चतुर्दशी समाधिस्त सोहळ्याचे पुण्यस्मरण यात्रेच्या रुपाने साजरे करण्यात येते. यादिवशी आवास येथील यात्रा अलिबाग तालुक्यातील पहिला यात्रा म्हणून मानले जाते. अलिबाग तालुक्यातील निसर्गरम्य, किनारपट्टीलगत असलेल्या आवास गावातील नागेश्वराच्या यात्रेची परंपरा गेल्या अनेक वर्षांची आहे. ही परंपरा याही वर्षी जपण्यात आली. आवास येथील श्री नागेश्वरच्या यात्रेमध्ये खाद्य पदार्थांसह हार, फुले, खेळणी आदी साहित्यांची दुकाने सजली होती. परंतु, पावसामुळे ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले. काही भक्त आदल्या दिवशी सोमवारी दर्शनासाठी आले होते. तर, काही भक्त मंगळवारी यात्रेच्या दिवशी आले होते. त्यामुळे दर्शनासाठीदेखील मोठी गर्दी नसल्याचे सांगण्यात आले. आकाश पाळणा व इतर खेळाचे स्टॉल होते. परंतु, त्या परिसरात चिखल, पाणी असल्याने त्या ठिकाणी खेळण्यासाठी कोणीच फिरकले नसल्याचे सांगण्यात आले.
यावर्षी पावसामुळे ग्राहकांची संख्या कमी दिसली. खरेदीला प्रतिसाद कमी मिळाला आहे. त्याचा खरेदीवर परिणाम झाला. 50 टक्के खरेदीवर परिणाम झाला आहे.
नवीन गुप्ता,
विक्रेता









