कमकुवत पुलावरुन अवजड वाहतूक सुरूच
| चौल | प्रतिनिधी |
अलिबाग-रोहा मार्गावरील वढाव येथील साकव कोसळल्यानंतर पुन्हा एकदा अलिबाग तालुक्यातील साकव, पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, याआधी नांगरवाडी, त्यानंतर सोमवारी वढाव येथील साकव कोसळला. आता पाल्हे पुलाचा नंबर लागेल की काय, अशी अवस्था या पुलाची झाली आहे. रात्री-अपरात्री हा पूल कोसळून महाड येथील सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे. मात्र, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला काहीच सोयरसूतक नाही, अशी परिस्थिती आहे. कारण, या पुलावरुन राजरोसपणे अवजड वाहतूक सुरू असतानाही त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
तालुक्यातील सहाण बायपासमार्गे नागाव, रेवदंडा आणि मुरुड तालुक्याला जोडणारा पाल्हे पूल हा एकमेव मार्ग आहे. कारण, पावसाळ्यादरम्यान अलिबाग-नागावदरम्यान असणारा बेली येथील पूल कमकुवत असल्याचे कारण सांगत बांधकाम विभागाने आधीच अवजड वाहतुकीसाठी बंद केला आहे. दरम्यान, ही सर्व वाहतूक पाल्हे पुलावरुन वळवण्यात आली आहे. परंतु, पाल्हे पूलही अवजड वाहतुकीसाठी बंद असतानादेखील या मार्गावरुन वाहतूक वळवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, बांधकाम विभाग आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड झाला आहे.
‘तडक' कार्यवाहीची अपेक्षा फेल
पाल्हे पूल कमकुवत असल्याचे खुद्द कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांनीच याआधी सांगितले असून, पुलाची दुरुस्ती करण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. जूनपासून आज पाच महिने व्हायला आले तरी अद्याप दुरुस्ती पूर्ण झालेली नाही. पुलाच्या लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. अद्याप तीन पिलरचे मजबुतीकरण बाकी असताना अवजड वाहने जातातच कशी? रात्री-अपरात्री पूल कोसळून दुर्घटना घडल्यास याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल, असा संताप नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
कवकुवत झालेल्या पुलावरुन एसटी बस सुरू करुन बांधकाम विभाग नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. या पुलाची दुरुस्ती होणार तरी कधी? या प्रश्नाचे उत्तर देणे कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांनी टाळले. पुलाची अवस्था गंभीर असताना प्रशासनाचे अधिकारी यावर काहीच बोलायला तयार नाहीत. मोठी दुर्घटना झाल्यास त्याला बांधकाम विभागाचे अधिकारीच जबाबदार असतील. अशा अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये, असा सवाल ॲड. राकेश पाटील यांनी केला आहे.
सद्यःस्थिती पूल कसा आहे?
पाल्हे पुलाच्या डागडुजीचे काम मागील जून महिन्यापासून सुरू आहे. अद्याप ते सुरूच आहे. सद्यःस्थितीत पुलाच्या खालील लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. तीन पिलरची डागडुजी करण्यात आली आहे. अद्याप तीन पिलरचे काम बाकी आहे. त्यातील एक पिलर अक्षरशः वाकला आहे. अशातच अवजड वाहने गेल्यास पूल कोसळण्याची शक्यता आहे. शेवटची घटका मोजणाऱ्या पुलाची सद्यःस्थिती अधिकाऱ्यांना मात्र माहिती नसावी, ही मोठी शोकांतिका आहे.
पाल्हे पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. परंतु, जर का अवजड वाहतूक सुरू असेल, तर वाहतूक विभागाला पत्र देऊन कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील.
मोनिका धायतडक,
कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग
रस्ते सुरक्षेच्या बाबतीत जिल्हा प्रशासन फेल ठरले आहे. वढाव येथील पूल कोसळल्यामुळे आता पाल्हे येथील एकमेव पूल अलिबाग, मुरुड, रोहा तालुक्यांना जोडणारा मार्ग आहे. आणि, पूल जर कोसळला, तर कामानिमित्त बाहेर पडणारे शेकडो लोक बेरोजगार होतील. बांधकाम विभागाची बेफिरी, निष्क्रियता आणि कंपन्यांच्या ओव्हर लोड वाहनांमुळे वढावचा पूल कोसळला, तसाच धोका पाल्हे पुलाला आहे. त्यामुळे नवीन पूल होत नाही, तोपर्यंत कंपन्यांची अवजड वाहने तात्काळ बंद करावीत.
ॲड. राकेश नारायण पाटील,
सामाजिक कार्यकर्ते
वढाव पूल कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे सहाण बायपासमार्गे वळविण्यात आली. पाल्हे पुलावरुन हलकी वाहतूक सुरू आहे. बांधकाम विभगाकडून पत्र आल्यास तात्काळ कार्यवाही करुन पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात येईल. संबंधित पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना तशा सूचना देण्यात येतील.
अभिजीत भुजबळ,
पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक विभाग












