पंजाबचा चार गडी राखून पराभव
| जयपूर | वृत्तसंस्था |
राजस्थान आणि पंजाब यांच्यात सवाई मानसिंग स्टेडियम जयपूर येथे खेळला गेला आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा चार गडी राखून पराभव केला. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 20 षटकांत 5 बाद 187 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानने 19.4 षटकांत 189 धावा करत विजय नोंदवला. त्याचबरोबर प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने पंजाब किंग्जविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्स संघाची सुरुवात खराब झाली. पंजाब संघाने पाच गडी गमावून 187 धावांचा पल्ला गाठला. मात्र, राजस्थानच्या देवदत्त पड्डिकल आणि यशस्वी जैस्वाल या जोडीच्या अर्धशतकाच्या जोरावर विजयावर शिक्कामोर्तब झाले.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सकडून सॅम करनने 31 चेंडूंत नाबाद 49 धावा केल्या. जितेश शर्माने 44 आणि शाहरुख खानने 23 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या. अथर्व तायडेने 19 आणि शिखर धवनने 17 धावांचे योगदान दिले. लियाम लिव्हिंगस्टोनने नऊ आणि प्रभसिमरन सिंगने दोन धावा केल्या. राजस्थानकडून नवदीप सैनीने सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याने अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांना बाद केले. ट्रेंट बोल्ट आणि ॲडम झाम्पाला प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश मिळाले.