पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली खंत
| पेण | प्रतिनिधी |
विविध क्षेत्रात प्रतिथयश मिळविणाऱ्या महनीय व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. परंतु, अशाच पद्धतीने समाजातली जी होतकरू मंडळी वेगवेगळ्या अधिकाराच्या पदावर विराजमान आहेत. अन्य क्षेत्रातही पुढे जात आहेत. प्रगती साधत आहेत. त्यांचा समाजाकडून आदर केला जात नाही, त्यांचे कौतुक केले जात नाही, त्यांच्या मानसन्मानाचा पुरस्कार केला जात नाही, अशी खंत लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी पेण येथे बोलताना व्यक्त केली.
ते पेण येथे अखिल भारतीय आगरी समाजिक संस्थेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रीय आगरी पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते. यावेळी आगरी समाजातील विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप उमटविणाऱ्या महनीय व्यक्तींचा गौरव करण्यात आला. मानपत्र, महावस्त्र, पुष्पगुच्छ, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यामध्ये प्रख्यात लोकगीतकार स्व. अनंत पाटील, प्रसिद्ध गायक संतोष पाटील, राष्ट्रपती पुरस्कार विजेते खेळाडू अशोक भोईर, सूर्यनमस्कारात वर्ल्ड रेकॉर्ड करणारे अजय पाटील, मेट्रोची महिला पायलट गार्गी ठाकूर, प्रख्यात चित्रकार प्रकाश पाटील, सहकार महर्षी सुरेश पाटील, शिक्षणमहर्षी अँड. पी. सी. पाटील, उद्योजक प्रदीप म्हात्रे, पत्रकारितेत आदर्श अग्रसेन, शिक्षणात स्वरूप शेळके यांचा समावेश होता.
अध्यक्षीय भाषणात सूर्यकांत पाटील यांनी आगरी समाजाविषयी माहिती व संस्थेच्या कार्याचा आलेख समाजाला सांगितला. यानिमित्त काढण्यात आलेल्या ध्यास या स्मरणिकेचे प्रकाशन श्री. शिसवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर इगतपुरीचे माजी सभापती जनार्दन माळी, एक्साईजचे निवृत्त उपायुक्त सुहास पाटील, व्यापारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष नारायण ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक संगीता पाटील, ॲड. पी.सी. पाटील, सुरेश पाटील, दयानंद भगत, कार्याध्यक्ष संजय ठाकूर, सरचिटणीस धनाजी घरत, सहचिटणीस नरेंद्र म्हात्रे, गजानन भोईर, कल्पना भगत, राजेंद्र वाघ आदींसह कार्यकारिणीचे पदाधिकारी व समाजातील इतर मंडळी उपस्थित होते. यानंतर झालेल्या कविसंमेलनात 47 कवींनी सहभाग घेतला. त्यांना सहभाग प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन आणि आभार कार्याध्यक्ष संजय ठाकूर यांनी मानले.