आरएसपीची वर्षारंभ सभा उत्साहात

| अलिबाग | वार्ताहर |

महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन, नागपूरच्या रायगड शाखेची सत्र शुभारंभ सभा मंगळवार, दि.6 ऑगस्ट रोजी स.म. वडके हायस्कूल, चोंढी, ता. अलिबाग येथे पार पडली.

या सभेस आर.एस.पी.चे राज्याचे कायदेशीर सल्लागार डॉ. अ‍ॅड. के.डी. पाटील, कोकण विभागीय समादेशक डॉ. श्रीकांत पाटील, रायगड जिल्हा समादेशक रवींद्र वाघमारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांच्या स्वागतानंतर रवींद्र वाघमारे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सभेची आवश्यकता तसेच मागील वर्षभरात राबविलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल, नागपूरचे महासमादेशक पितांबर महाजन यांनी दिलेल्या लिखीत स्वरुपातील माहिती व सूचनांचे वाचन श्रीकांत पाटील यांनी केले. यावेळी उपस्थित प्रमुख मार्गदर्शक अ‍ॅड. के.डी. पाटील यांनी संघटनेच्या विस्तार व सशक्तीकरणाविषयी मार्गदर्शन केले.

या संपूर्ण चर्चेत मुरुड तालुका समादेशक लियाकत धनसे, अलिबाग तालुका समादेशक संजय डोंगरे, उपसमादेशक आर.एन. पाटील, श्रीवर्धन तालुका समादेशक किशोर सायगावकर, तालुका समन्वयक केदार पाटील, पथक अधिकारी संदीप वारगे, सूरज पाटील, बापू माळी व सौ. इलमकर यांनी सहभाग घेतला. यावेळी शाळा स्तरावर आर.एस.पी. विद्यार्थी मेळावे, तालुका व जिल्हास्तरावर विद्यार्थी-शिक्षक मेळावे तसेच शिक्षक प्रशिक्षण वर्ग घेण्याचे ठरविण्यात आले. विद्यार्थी मेळावा अंतर्गत पथकसंचलन सिग्नल पी.टी., वाहतूक सुरक्षा,नागरी संरक्षण, प्रथमोपचार व आपत्ती व्यवस्थापन, योग प्रशिक्षण इ. विविध प्रकारचे अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले. शेवटी जिल्हा समादेशक रवींद्र वाघमारे यांनी सर्वांचे आभार मानले व सभेची सांगता झाली.

Exit mobile version