जिल्हा समादेशकपदी रवींद्र नाईक
। अलिबाग । वार्ताहर ।
रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण ऑर्गनायझेशन कोल्हापूर या राज्य संघटनेच्या वतीने रायगड जिल्हा आरएसपी शिक्षक बंधू-भगिनी यांची सत्र शुभारंभ सभा व एकदिवसीय कार्यशाळा प्रायव्हेट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पेण येथे पार पडली. या सभेमध्ये आरएसपीचे रायगड जिल्हा समादेशक म्हणून रवींद्र नाईक यांची, तर कार्याध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गोरीवले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
राज्याचे आरएसपीचे महासमादेशक अनिल कुंभार यांनी या सभेचे आयोजन केले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रायव्हेट स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका अंजली जोशी उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बागुल यांची विशेष उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक कोकण विभागीय समादेशक विलास पाटील यांनी केले. सभेचे प्रास्ताविक महासमावस्य अनिल कुमार यांनी केले. उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांनी आरएसपी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे असे नमूद केले. कोकण परिक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये विविध कार्यक्रम राबविण्याकरिता, वाहतुकीचे नियंत्रण करण्याकरिता आरएसपी शिक्षक आणि विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य निश्चितपणे लाभेल आणि पोलीस दलाकडून आपल्याला आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे नमूद केले. यावेळी आरएसपीचे कोकण विभागीय सल्लागार दीपक मोकल, पोलीस निरीक्षक बागुल, मुरूमकर, अंजली जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सभेचे आभार म्हात्रे यांनी व्यक्त केले. या सभेसाठी रायगड जिल्ह्यातील 106 आरएसपी शिक्षक उपस्थित होते.