आरटीई प्रवेशाची यादी लांबणीवर

। रायगड । प्रतिनिधी ।

शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 25 टक्के जागांवर प्रवेशाची प्रक्रिया बारगळली आहे. यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल असल्याने सोडत जाहीर करूनही शिक्षण विभागाने तपशील जाहीर केलेला नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार सोडत जाहीर करणार असल्याची भूमिका शिक्षण विभागाने जाहीर केली आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये देण्यात येणार्‍या प्रवेशाची यादी 13 जून रोजी प्रसिद्ध होणार होती. मात्र, आरटीईचे संकेतस्थळच खुले होत नसल्याच्या तक्रारींमुळे पालक आणि विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. आता पालकांना आणखी चार-पाच दिवस वाट पहावी लागणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. शाळा सुरु होण्याचे दिवस जवळ आले असताना ही आमच्या मुलांचे प्रवेश कधी होणार असा सवाल पालकांनी केला आहे. शिक्षण विभागाने आरटीई प्रक्रियेत केलेला बदल, त्याला न्यायालयाने दिलेली स्थगिती, त्यानंतरच जुन्या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय, या गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर काही पालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यात यंदा 9 हजार 217 शाळांमध्ये 1 लाख 5 हजार 399 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. या जागांसाठी अर्ज करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 31 मे पर्यंतची मुदत दिली होती. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने 5 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर 2 लाख 43 हजार 19 अर्ज दाखल झाले असून त्यासंदर्भाने प्रवेशाची सोडत 7 जून रोजी निश्‍चित करण्यात आली होती. परंतु प्रकरण न्यायालयात पोहोचल्याने प्रवेशाची यादी 13 जूननंतर प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र, 13 जून रोजी संकेतस्थळच खुले होत नसल्याचे पाहून पालकांमध्ये पुन्हा खळबळ निर्माण झाली.

Exit mobile version