दोन दिवसांत 184 कारवाया
। नवी मुंबई । वार्ताहर ।
बेशिस्त रिक्षाचालकांवर आरटीओने कारवाईची धडक मोहिम सुरू केली आहे. त्याद्वारे दोन दिवसांत 184 रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. ज्यादा प्रवासी घेणे, भाडे नाकारणे, इन्शुरन्स तसेच फिटनेस सर्टिफिकेट नसणे अशा विविध कारणाखाली या कारवाया केल्या जात आहेत. रिक्षाचालकांच्या मुजोर वागण्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत. शिवाय वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यात देखील रिक्षा व दुचाकीचालकांचा सर्वाधिक समावेश दिसून येत आहे. त्यानुसार नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाने बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. त्याद्वारे आरटीओचे पथक रिक्षांच्या कागदपत्रांची तपासणी करत आहेत. तर काही अधिकारी प्रवासी बनून रिक्षाचालक भाडे नाकारतो आहे का? याची चाचपणी करीत आहेत. त्यामध्ये दोषी आढळणार्या रिक्षाचालकांवर कारवाई केली जात आहे. दोन दिवसांत 184 रिक्षांवर कारवाई करण्यात आल्याचे आरटीओ अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी सांगितले. रिक्षाचालकांकडे रिक्षाचा इन्शुरन्स व फिटनेस सर्टिफिकेट आहे का, हे तपासले जात आहे, त्याशिवाय रस्त्यावर रिक्षा चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन होत आहे का याचीही चाचपणी होत आहे.
कारवाईमुळे धाबे दणाणले
या कारवाईमुळे बेशिस्त रिक्षालाचकांचे धाबे दणाणले असून, कारवाईच्या भीतीने काही रिक्षाचालकांनी रिक्षा बाहेर काढणेही बंद केले आहे. बोगस रिक्षाचालक परवाना नसतानाही रिक्षा चालविणे असे प्रकार शहरात घउत असतात. अशा रिक्षाचालकांमुळे अपघाताचा धोका असून अपघातानंतर त्यांना शोधणेही कठीण असते. त्यामुळे अशा मुजोर रिक्षाचालकांना आळा घालण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे. त्यातच आरटीओने सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे बेशिस्त रिक्षाचालकांना शिस्त लागेल अशी अपेक्षा नागरीक व्यक्त करीत आहेत.