मतदान केंद्रात नियमांचा खेळखंडोबा

सुरक्षेवर थेट संशयाचा बॉम्ब

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान लोकशाहीच्या नियमांची उघडपणे पायमल्ली झाल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणा, पोलीस प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या दुजाभावावर जनतेतून संताप व्यक्त होत आहे.

उरण तालुक्यात मतदानाच्या दिवशी वृत्तसंकलन करत असलेल्या पत्रकारांकडून पोलिसांनी आक्रमक पद्धतीने ओळखपत्रांची मागणी करत मतदान प्रक्रियेचे फोटो काढण्यास मनाई केली. ओळखपत्र दाखवल्यानंतर त्यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. मात्र, पत्रकारांसाठी कडक नियम असताना लोकनेत्यांचे मतदानानंतरचे मतदान कक्षातील फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी आणि सत्ताधाऱ्यांसाठी वेगवेगळे नियम आहेत का, असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्यातच राज्याचे आमदार भुमरे यांनी स्वतःच्या मुलाला मतदान केंद्रावर नेऊन त्याच्या बोटाला शाई लावल्याचे फोटो व्हायरल झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा प्रकार म्हणजे निवडणूक आचारसंहितेची पायमल्ली असल्याचा आरोप होत आहे.

मतदानानंतर उरण-बोकडवीरा येथील सिडको प्रशिक्षण केंद्रातील स्ट्राँगरूम परिसरात रात्रीच्या अंधारात 9 ते 10 व्यक्ती विना ओळखपत्र वावरत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. प्रशासनाकडून ते आमचेच कामगार असल्याचा खुलासा करण्यात आला. तरी देखील त्यातील एकाही व्यक्तीकडे ओळखपत्र नसणे ही बाब धक्कादायक आहे. त्यामुळे स्ट्राँगरूमसारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी विनाओळखपत्र, विनापरवाना आणि रात्रीच्या वेळी वास्तव्य करण्याची मुभा देणारे आदेश कोणी दिले? सुरक्षेशी खेळ करून लोकशाहीच्या मुळावर घाव घातला जात आहे का? असा संतप्त सवाल उमेदवार दीपक भोईर यांनी उपस्थित केला आहे. तसेच, या संपूर्ण प्रकरणाची सखोल, पारदर्शक आणि निर्भीड चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा व निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायमचा उद्ध्वस्त होईल, असा इशारा दीपक भोईर यांनी दिला आहे.

Exit mobile version