सुरक्षा यंत्रणांची झाली धावपळ
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
खोपोली शहराच्या रहाटवाडा या परिसरात असणाऱ्या पुलावरून दोन मुले वाहून गेल्याची खबर सकाळी बारा वाजताच्या सुमारास अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्या समजली. तातडीने त्या ठिकाणी गुरुनाथ साठेलकर , विजय भोसले, अमोल कदम, सुनिल पुरी, योगेशऔटी, भक्ती साठेलकर तेथे पोचले.
खोपोली फायर ब्रिगेडचे ऑफिसर हरी सूर्यवंशी हे देखील त्या ठिकाणी दाखल झाले. खोपोली पोलीस स्टेशनचे एपीआय हरीश काळसेकर यांनी देखील तेथे धाव घेतली. तोवर ही खबर वाराच्या वेगाने खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनुप दुरे आणि खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी यांच्यापर्यंतही पोचली होती. खोपोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी, खोपोली नगरपालिकेचे कर्मचारी इत्यादींनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांसोबत संपूर्ण परिसर पिंजून काढला.

हनिफ कर्जीकर, अमोल ठकेकर, दिनेश ओसवाल, धवल भानुशाली, राजेश पारठे, अमित गुजरे यांनी जागोजागी नदीच्या प्रवाहावर लक्ष ठेवले. सरते शेवटी ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे, सहा. पोलीस निरिक्षक हरीश काळसेकर आणि खालापुरचे तहसीलदार आयुब तांबोळी यानी त्या परिसराला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
खालापुरचे तहसीलदार आयुब तांबोळी यानी सर्व अधिकारी वर्गा सोबत चर्चा करुन झेनिथ धबधबा परिसर, विणानगर, कृष्ण नगर, युनी माऊंट रेसिडेन्सी, डीसी नगर आणि शिळफाटा परिसराला भेट देऊन तेथील परिस्थती जाणून घेत सुरक्षा यंत्रणेच्या कर्मचारी वर्गाला सतर्क रहण्याचे निर्देश दिले आणि नागरिकांना अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सतर्क रहावे असे आवाहन केले आहे.