‘रन बडीज’ या संस्थेचा उपक्रम
| माथेरान | वार्ताहर |
माथेरानचे पर्यटन वाढावे आणि माथेरान पर्यटनस्थळाचे नाव सर्वदूर पोहचावे या उद्देशाने मुंबई व पुणे येथील ‘रन बडीज’ या संस्थेच्या माध्यमातून निसर्गरम्य माथेरान पर्यटनस्थळी खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निसर्ग संवर्धनासाठी या ठिकाणी पर्यटक एकत्र धावले.
माथेरानच्या आल्हाददायक थंडीत धुक्याची दुलई बाजूला सारत येथील लालमातीच्या रस्त्यावर इथल्या मोकळ्या निसर्गात धावण्यासाठी येथे देशभरातील धावपट्टूनी ‘रन बडीज’ या संस्थेच्या माथेरान मॅरेथॉन स्पर्धेत उस्फुर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये मुंबई, पुणे, गुजरात, दिल्ली, पंजाब येथून धावपट्टूनी या स्पर्धेत सहभाग घेतला. 10 कि.मी, 25 कि.मी, 35 कि.मी व 50 किलोमीटर असे चार टप्यात स्पर्धा संपन्न झाली. या ठिकाणी एकूण 180 स्पर्धकांनी भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी केली. माथेरानमधील एका हॉटेलमध्ये स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. येथे सध्या पावसाळी पर्यटनानंतर पर्यटकांची संख्या थोडी फार रोडावली आहे. त्यामुळे माथेरानच्या पर्यटन वाढीसाठी व निसर्गसंवर्धनासाठी अशा स्पर्धा येथे घेतल्या गेल्या पाहिजेत. अशा स्पर्धेमुळे माथेरानमधील माल वाहणार्या कुलीपासून रेस्टॉरंट, पॉईंटचे दुकानदार व हॉटेलवाले यांनादेखील रोजगार मिळाला. या स्पर्धेत भारतातील विविध राज्यांमधून स्पर्धक आल्याने येथे पर्यंटनवाढीसाठी ही स्पर्धा खूप महत्वाची असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.