नवी मुंबई विमानतळावर ‌‘रुस्लान‌’ची दमदार एंट्री!

अबुधाबीहून 46 टन विशेष माल घेऊन विमान दाखल; अवजड कार्गो हाताळणीच्या क्षमतेचे प्रदर्शन

| पनवेल | प्रतिनिधी |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो क्षमतेची बुधवारी आणखी एक महत्त्वाची चाचणी झाली. जगातील सर्वात मोठ्या मालवाहू विमानांपैकी एक असलेले ‘अँटोनोव्ह एएन-124 रुस्लान’ हे महाकाय विमान अबुधाबीहून सुमारे 46 टन विशेष माल घेऊन नवी मुंबई विमानतळावर यशस्वीरीत्या दाखल झाले.

अवजड आणि आकाराने मोठ्या मालाची वाहतूक करण्यासाठी अँटोनोव्ह एएन-124ची विशेष ओळख आहे. या विमानाच्या पुढील भागाला उघडता येणारा स्वतंत्र दरवाजा असल्याने मोठ्या आकाराची यंत्रसामग्री आणि इतर अवजड वस्तू विमानात चढविणे तसेच उतरविणे शक्य होते. त्यामुळे पारंपरिक मालवाहू विमानांपेक्षा वेगळ्या प्रकारच्या कार्गो वाहतुकीसाठी या विमानाचा वापर केला जातो.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर या महाकाय विमानाचे आगमन झाल्याने मोठ्या आकाराचा आणि विशेष स्वरूपाचा माल हाताळण्याची विमानतळाची क्षमता अधोरेखित झाली आहे. भविष्यात नवी मुंबई विमानतळ मुंबई महानगर प्रदेशातील महत्त्वाचे हवाई मालवाहतूक केंद्र म्हणून विकसित होत असताना अशा प्रकारच्या विमानांची हाताळणी औद्योगिक आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी महत्त्वाची ठरणार आहे. रायगड, नवी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्यासाठी विमानतळाची कार्गो सुविधा निर्णायक ठरू शकते. त्यामुळे 46 टन माल घेऊन आलेल्या अँटोनोव्हच्या आगमनाकडे नवी मुंबई विमानतळाच्या कार्गो प्रवासातील महत्त्वाची घडामोड म्हणून पाहिले जात आहे.

Exit mobile version