| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायतीमधील चांधई गावातील विजेचे खांब 1980 मध्ये उभे केले आहेत. त्या विजेच्या खांबांचे आयुष्यमान संपून गेले आहे. त्यामुळे ते विजेचे खांब बदलण्याची आवश्यकता असून, महावितरण कंपनी अपघात होण्याची वाट पाहात आहे का, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
चांधई खुर्द आणि बुद्रुक या गावांमध्ये महावितरणकडून 1980मध्ये वीज पोहोचली. त्यावेळी महाराष्ट्र विद्युत कंपनीकडून लोखंडी विजेचे खांब वीजवाहिन्या खेचण्यासाठी उभे केले जायचे. त्या खांबांची स्थिती आज कधी कोसळतील अशी झाली आहे. दहा वर्षांपूर्वी कर्जत तालुक्यात इन्फ्रा प्रकल्पांतर्गत बहुसंख्य गावांमधील विजेचे खांब तसेच कंडक्टर बदलण्यात आले. मात्र, यापैकी कोणतीही कामे चांधई या दोन्ही गावांमध्ये झाली नाहीत. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांकडून जुने विजेचे हे खांब काढून नव्याने उभारण्याची मागणी झाली होती. मात्र, महावितरणकडून चांदई येथील दोन्ही गावे विजेच्या नवीन खांबांपासून दूर आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वार्याने नसरापूर ग्रामपंचायतीमधील विजेचे खांब कोसळले होते आणि त्यानंतर पाच दिवस या ग्रामपंचायतीमधील सर्व गावांची वीज खंडित होती. परिणामी, पिण्याचे पाणीदेखील गावात पोहोचले नव्हते.
मागील दहा वर्षे स्थानिक ग्रामपंचायतीकडून सातत्याने नवीन विजेचे खांब बदलले जात नाहीत. त्यात या दोन्ही गावांतील विजेचे खांब हे पूर्णपणे गंजले असून, ते या पावसाळ्यात वादळात कोसळू शकतात. दोन्ही गावातील खांबांच्या आजूबाजूला लोकवस्ती आणि त्यामुळे विजेचे खांब कोसळून मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे महावितरणकडून चांधई गावामधील विजेचे खांब बदलण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. ग्रामस्थांनी त्याबाबत अनेकवेळा पत्रव्यवहारदेखील केला आहे. मात्र, महावितरणकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे स्थानिक संतप्त असून, महावितरण कंपनी अपघात होण्याची वाट पाहात आहे काय, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
स्थानिक ग्रामस्थ सुनील रसाळ यांनी दोन्ही गावातील विजेच्या खांबांबद्दल आ. महेंद्र थोरवे यांच्याकडे गावाची समस्या मांडली आहे. तर, महावितरणचे उपअभियंता प्रकाश देवके यांनी इन्फ्रा प्रकल्पात नवीन विजेचे खांब आणि कंडक्टर बदलण्याबाबत कार्यवाही करण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती दिली आहे.