शाळा सभापतींचे उद्घाटनासाठी पवारांना साकडे
| पोलादपूर | प्रतिनिधी |
रयत शिक्षण संस्था सातारा संचालित विद्यामंदिर पोलादपूर प्रशाला आता पूर्णपणे पोलादपूरचे ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ देवस्थानलगत स्थलांतरीत करण्यात आली आहे. याठिकाणी एम्पॅर्थी फाऊंडेशनच्या 1 कोटी रूपये खर्चाच्या इमारतीचे उद्घाटन न करताच रयत शिक्षण संस्थेची शाळा सुरू झाल्यानंतर शाळा सभापती निवास शेठ यांनी उद्घाटनासाठी थेट रयत शिक्षण संस्थेचे तहहयात अध्यक्ष खा.शरद पवार यांनाच साकडे घातले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे विद्यामंदिर पोलादपूरच्या एस.टी.स्थानकालगतच्या इमारतीचा महामार्गाशी संपर्क तुटल्याने श्रीकाळभैरवनाथ देवस्थानाच्या परिसरातील इमारतीमध्ये पूर्णपणे स्थलांतर करण्याची गरज निर्माण झाली. 1 जानेवारी 2019 रोजी पोलादपूर येथे येऊन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री सुनील तटकरे यांनी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी दानशूर संस्था तसेच, व्यक्तींसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची चर्चा सुरू असताना केवळ तिथे होतो म्हणून रायगड जिल्ह्यातील एका शाळेसाठी मदत मिळण्याची आग्रही भूमिका घेतल्याने तातडीने पोलादपूर विद्यामंदिराला 1 कोटीचा लाभ उपलब्ध होणार असून विद्यामंदिर पोलादपूरचा शैक्षणिक विकास साध्य करता येईल, असा विश्वास व्यक्त केला होता.
पोलादपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या विद्यामंदिरामध्ये इंग्रजी माध्यमाची ज्युनियर के.जी. व के.जी. शाळा, माध्यमिक शाळा तसेच विज्ञान वाणिज्य आणि कला शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग भरत असून, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा. पवार यांच्या माध्यमातून विद्यमान खा. तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या एम्पॅथी फाऊंडेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन जून 2023 मध्ये समारंभपूर्वक करण्याची तयारी शाळा समिती सदस्य निवास शेठ आणि सहकारी लवकरच सुरू करणार आहेत.