गावठाण विस्तारासाठी साकडं

मोरा कोळीवाडा ग्रामविकास समितीचे निवेदन
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
उरणच्या मोरा कोळीवाडा ग्रामविकास समितीने गावठाण विस्तारासाठी जिल्हा प्रशासनाला साकडं घातले असून, याबाबत जिल्हाधिकारी रायगड यांना निवेदन देण्यात आले आहे. मोरा कोळीवाडा मूळ गावठाण आणि विस्तारित गावठाण यांचे शेवटच्या घरापर्यंतचे सिम्मांकन करून मोरा गावाशेजारी समुद्रातील बंदर, बोटी पार्किंगच्या जागांचा सर्वे करून, घरांचे प्रॉपर्टी कार्ड, मोकळ्या जागा मासळी मार्केट, बंदर, मासे सुकवण्याच्या जागा यांचे सीमांकन करून लोकवर्गणी, लोकसहभागातून, मोरा गावठाण विस्तार करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.

सदरच्या निवेदनात मोरा कोळीवाड्याचे सीमांकन होणे ही सर्व नागरिकांची मागणी असून त्याबाबतीत जाहीर ठराव घेऊन करण्यात आला आहे. आज नव्याने विकसित झालेले जेएनपीटी बंदर हे मोरा मच्छीमार बंदराच्या सागरी मच्छीमार क्षेत्रात उभारले आहे. त्यामुळे येथील मासेमारी आणि कोळीबांधव बाधित प्रकल्पग्रस्त आहेत त्याचप्रमाणे शिवडी सी लिंक तसेच अनेक सीलिंक प्रकल्पामुळे तसेच नवी मुंबई महानगर पालिका , मुंबई महानगर पालिका, पनवेल महानगरपालिका यांचे प्रदूषित गटाराचे पाणी तसेच एमआयडीसींचे प्रदूषित रसायन मिश्रित पाणी यामुळे मासेमारी व्यवसाय बाधित आहे. यासाठी मोरा कोळीवाड्याच्या गवठणाचा सर्वे तसेच लोकसंख्या, घरे, बंदर याचा सामाजिक आघात सर्वे होणे गरजेचे आहे.अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

लोकवर्गणी आणि लोकसहभागातून मूळ गावठाणाचे आणि विस्तारित गावठाणाचे खाजगी सर्वेअर कडून जाहीर मोजणी करण्याचा मोरा- कोळीवाडा ग्रामविकास समितीने निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत अधिनियम अंतर्गत गावठाण विस्तार उपक्रमास शासकीय मान्यता आहे. म्हणून मोरा कोळीवाड्यास महसूल विभाग, मस्त्य आयुक्त, बंदर अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने यांची नोंद घेऊन त्यास सुरक्षा देण्याच्या संदर्भात मोरा कोळीवाडा ग्रामविकास समिती उरण या समितीचे अध्यक्ष प्रशांत दत्ताराम कोळी हेमंत गोविंद कोळी उपाध्यक्ष, राकेश कोळी तसेच समितीचे कायदेविषयक सल्लागार व गावठाण विस्तार चळवळीचे नेते राजाराम पाटील यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

मोरा कोळीवाड्यामध्ये कोळीवाड्याचा सोशल इम्पॅक्ट सर्वे न करता जेट्टीचे अनधिकृत बांधकाम चालू आहे त्यामुळे मच्छिमारांचे मोरा बंदर उध्वस्त होऊन मच्छिमारांवर उपासमारीची पाळी येणार आहे ;येत्या 15 दिवसात जिल्हाधिकारी यांनी सर्वे न केल्यास मच्छीमार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. – प्रशांत कोळी ( अध्यक्ष ग्रामविकास समिती)

मोरा कोळीवाडा सम्राट अशोकाकालीन आंतररराष्ट्रीय बंदर असून तेथे बौधकालीन लेणी सुद्धा आहेत याचे पुरातत्वीय महत्व लक्षात न घेता रो -रो जेट्टीचे काम सुरु आहे. यामुळे कोळीवाड्यातील घरांना धोका संभवतो म्हणूनच मोरा कोलीवाड्याचा गावठाण विस्तार शासनाने मंजूर करणे गरजेचे आहे. – राजाराम पाटील (गावठाण विस्तार चळवळीचे नेते )
Exit mobile version