। चिपळूण । वृत्तसंस्था ।
चिपळूणमधून शिवसेनेचा उमेदवार दिला नाही, तर येथील शिवसेना संपण्याचा धोका निर्माण होणार असल्याचा, इशारा शिवसेनेचे उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर सदानंद चव्हाण नाराज झाल्यामुळे महायुतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. महायुतीच्या जागावाटपात चव्हाण यांना विश्वासात न घेतल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते हे नाराज झाले आहेत. त्याचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना 2004 मध्ये पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते पक्षातून बाहेर पडले. त्या वेळी चिपळूणमधील शिवसेना पूर्णपणे भूईसपाट झाली होती. शिवसेनेच्या कठीण काळात चव्हाण यांनी पक्षाचे तालुकाप्रमुख पद घेतले आणि पुन्हा मतदार संघात शिवसेना उभी केली. 2009च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. 2014 मध्येही शिवसेनेने चिपळूणचा गड राखला. 2019 मध्ये चव्हाण पराभूत झाले; मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर चव्हाण मनापासून या आघाडीमध्ये खुश नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले. त्यांना सरकारी महामंडळ किंवा चिपळूणमधून पुन्हा उमेदवारी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. महायुतीमध्ये चिपळूणचा उमेदवार निवडताना त्यांना विश्वासात घेतले गेले नाही. शिंदे यांची भेट घेतली आणि आपण नाराज असल्याचे त्यांनी सांगितले.
चिपळूणमध्ये राष्ट्रवादीला उमेदवारी मिळाली म्हणून मी नाराज नाही. 20 वर्षात मी कष्टाने शिवसेना उभी केली. त्या शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह चिपळूणमधून हद्दपार होण्याचा धोका आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आल्यानंतर तो शिवसेना वाढवणार नाही. शिवसेनेचे मतदार राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करण्याच्या मानसिकतेत नाहीत, ही व्यथा मी मुख्यमंत्री शिंदे यांना कळवली आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून वेळप्रसंगी मी वेगळा निर्णय घेण्यात येईल.
सदानंद चव्हाण,
माजी आमदार, चिपळूण