। रसायनी । वार्ताहर ।
मुंबईतील भांडूप, घाटकोपर येथील 26 जणांचा ग्रुप वाशिवली गावाजवळील माणिक गडावर ट्रेकिंगसाठी गेले होते. कोणताही वाटसरू न घेता सकाळी दहा वाजता गड चढण्यास सुरूवात केली. उत्साहाच्या भरात पुढे असलेले श्रेयस देड, किरण होना, यशपाल मोमाया, चिराग शहा आणि रीदय ठक्कर हे वाट भरकटले.
गडावर मोबाईलला नेटवर्क नसल्याने भरकटलेल्या पाच जणांचा इतर जणांशी संपर्क तुटला. ग्रुपमधील काही तरुणांनी मदतीसाठी 112 क्रमांकावर फोन करून ट्रेकिंग करिता आलेले 5 पर्यटक हे रसायनी पोलीस ठाणे हद्दीतील माणिकगड किल्ल्याचे डोंगराळ परिसरात भरकटलेले असल्याबाबत कळवले. यावेळी पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी तातडीने पोलीस हवालदार मंगेश लांगी, पोलीस शिपाई राहुल भडाले, पोलीस शिपाई बाळासाहेब तिडके यांना तात्काळ माणिकगड किल्ल्याच्या डोंगराळ परिसरात रवाना केले. यावेळी पोलीस पथकाने वाशिवली ठाकूरवाडी येथील माहितगार व्यक्तीलर सोबत घेऊन माणिकगड किल्ल्याच्या डोंगराळ परिसरात शोध घेण्यास सुरवात केली. संध्याकाळाच्या सुमारास या भरकटलेल्या पाच तरुणाना शोधण्यात पोलिसांना यश आले.