| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत चौक राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या सोंडाई गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या अनोळखी ट्रेकर्स रस्ता भरकटले. रात्रीच्या अंधारात गडावर जाण्याचा त्यांचा प्रयत्न फसला आणि आयटी विद्यार्थी असलेले तरुण भरकटले. दरम्यान, माऊंट एव्हरेस्ट वीर गिर्यारोहक संतोष दगडे यांनी आपल्या सहकारी गिर्यारोहक यांच्यासह रस्ता भरकटलेल्या सात जणांना सुखरूप मुख्य रस्त्यावर आणले.
सोमवारी (दि.18) मध्यरात्री मुंबई येथे आयटी शिक्षण घेत असलेले तरुण कर्जत जवळील सोंडाई किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आले होते. राजस्थान आणि आग्रा येथील मूळ रहिवाशी असलेले हे तरुण मध्यरात्री एक वाजता कर्जत रेल्वे स्थानकात पोहचले. सात तरुण आपला दुसरा ट्रेक करण्यासाठी सोंडाई किल्ल्याकडे निघाले होते. कर्जत स्टेशन जवळील युको बँक येथून रिक्षाने ते वावरले ठाकूरवाडी येथे पोहचले. त्यावेळी पहाटेचे तीन वाजले होते आणि तेथे स्थानिक आदिवासी लोकांची कोणतीही मदत न घेता ते तरुण सोंडाई किल्ल्याचा फलक बघून गड चढू लागले. त्यावेळी रात्रीच्या अंधारात थकून थांबले त्यावेळी त्यांना तेथून खाली येणे शक्य नव्हते. मंगळवारी (दि.19) सकाळी साडे सात वाजता कर्जत येथील माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे संतोष दगडे, विवेक शिवडे, राहुल मेश्राम यांना बोलावण्यात आले. त्यानुसार सोंदाई किल्ल्यावर रस्ता भरकटलेल्या तरुणांना शोध घेण्यास सुरुवात केली.
सकाळी नऊ वाजता कर्जत येथून मदतीसाठी निघालेले गिर्यारोहक सोंडाई गडावर पोहचले आणि त्या सात तरुणांना शोधू लागले. पहाटे तीन वाजता गड चढायला निघालेले ते आयटी शिक्षण घेणारे तरुण यांच्याकडे केवळ एक लिटर पाणी होते. गिर्यारोहक असल्याने संतोष दगडे यांना हौशी ट्रेकर्स यांची कार्यपध्यती माहिती असल्याने सोबत जाताना पाणी, बिस्किटे नेली होती. 21 वयोगटातील रस्ता भरकटलेल्या त्या तरुणांपर्यंत पोहचल्यावर त्या सर्व सात जणांना चालणे देखील शक्य नसल्याचे दिसून आले. त्यातील दोन तरुण हे पूर्ण थकून जमिनीवर पडले होते. साधारण दोन तास आराम करून 45 मिनिटे परतीचा प्रवास करून संतोष दगडे आणि सूरज प्रजापती यांनी त्या सात जणांना ठाकूर वाडी येथे आणले. त्या तरुणांपर्यंत पोहचण्यासाठी घेतलेली मेहनत याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
सोंडाई गडावर अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका
