सागरी, खाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचा कडेकोट पहारा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सागरी सुरक्षा अधिक बळकट ठेवण्यासाठी तसेच सागरी व खाडी किनारी होणाऱ्या संशयीत हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी रायगड पोलिसांच्या वतीने सागरी कवच अभियान सुरु केले होते. या अभियानाची सुरुवात मंगळवारी (दि.24) सकाळी सहा वाजल्यापासून करण्यात आली. यासाठी रस्त्यावर खाडी, सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदरांसह समुद्रकिनाऱ्यांवर पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला होता. बुधवारी (दि. 25) सायंकाळी या अभियानाचा समारोप करण्यात आला.
पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात आले. या अभियानासाठी जिल्ह्यातील 15 हून अधिक खाडी व सागरी पोलीस ठाण्यासह इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाक्या नाक्यावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांसह एकूण एक हजार 62 सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली होती. 81 पोलीस अधिकारी, 631 पोलीस अंमलदार असे 712 पोलीस अधिकारी कर्मचारी, शंभर होमगार्ड, 250 सागर सुरक्षा दलाचा समावेश होता. हे सागरी कवच अभियान 36 तासांचे होते. हे अभियान बुधवारी सायंकाळी सहा वाजता हे अभियान संपले असल्याची माहिती रायगड पोलिसांकडून देण्यात आली.
सागरी सुरक्षा अधिक बळकट करण्याबरोबरच सागरी किनारी होणाऱ्या संशयीत हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले होते. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, वरसोली, काशीद, मांडवा, आवास, रेवस, किहीम, रेवदंडा, नागाव, आक्षी, मुरूड, दिवेआगार, आगरदांडा, दिघी, श्रीवर्धन, म्हसळा अशा अनेक समुद्रकिनारी तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या बंदरावरील सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी हे अभियान राबविण्यात आले होते.
