साहेबांचा डाव गडगडला

भारतीय गोलंदाजीसमोर इंग्लंडची नांगी
पहिला डाव सर्वबाद 183
| इंग्लंड | वृत्तसंस्था |
भारताचा यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच्या भेदक मार्‍यासमोर यजमानांनी गुडघे टेकले. परिणामी, यजमान इंग्लंड संघाचा पहिला डाव अवघ्या 183 धावांत आटोपला. कर्णधार ज्यो रुट याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी साहेबांचे मनसुबे उधळून लावले.

इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. आपला निर्णय सार्थ ठरवण्यासाठी कर्णधार जो रुट याने एकट्याने खिंड लढवली. त्याने 108 चेंडूंत 64 धावांची खेळी केली. इंग्लंडच्या चार फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. कर्णधार जो रुट याचा अपवाद वगळता एकही फलंदाज फारकाळ मैदानावर थांबू शकला नाही. बर्न्स, झॅक क्राऊली, डी. सिब्ले, लॉरेन्स, जॉस बटलर आणि रॉबिन्सन यांना आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. बुमराह, शमी आणि शार्दुल ठाकूर यांनी इंग्लंडच्या संघाला 200 च्या आत गुंडाळलं. बुमराह याने चार फलंदाजांना बाद करत इंग्लंडच्या संघाला बॅकफूटवर ढकललं. तर शमीनं तीन फलंदाजांना बाद करत यजमानांचे कंबरडे मोडले. भारताकडून बुमराहने 4, शमी 3, शार्दुल ठाकूर 2 आणि सिराजने एका फलंदाजाला माघारी झाडलं.

पहिल्या दिवशी इंग्लंड संघाला 183 धावांत रोखल्यानंतर भारतीय फलंदाजांनी संयमी सुरुवात केली. सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि के. एल राहुल या जोडीने भारताला आश्‍वासक आणि समाधानकारक सुरुवात करुन दिली. राहुल-रोहित जोडीने पहिल्या दिवसाखेर 13 षटकांत 21 धावांची सलामी दिली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी रोहित शर्मा (9) आणि के. एल राहुल. (9) धावांवर खेळत होते. भारत अद्याप 162 धावांनी पिछाडीवर आहे.

Exit mobile version