| श्रीवर्धन | वार्ताहर |
यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असल्यामुळे पुरूष यशस्वी होतो, असे अनेकदा ऐकण्यात येते. परंतु एखाद्या स्त्रीला पतीने पाठिंबा दिल्यास स्त्री ही यशस्वी होते. याचे उत्तम उदाहरण श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते या खेडेगावात बघावयास मिळाले.
भोस्ते खेडेगावातील तेहतीस वर्षीय सायली सुरज वैराग यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले. मोलमजुरी व घरची शेती करीत आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावणे व वेळ मिळाला की दोन्ही मुलांचा अभ्यास घेणे ही दिनचर्या. सायली यांच्या पतीचा मुळचा व्यवसाय रिक्षाचा आहे. स्वतःच्या मालकीच्या तीन रिक्षा व शेती यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली आहे. सुरज हे अनेक वर्षे रिक्षा व्यवसाय करतात. तीन पैकी दोन रिक्षा व्यवसायासाठी लावल्या आहेत, तर एक रिक्षा चालका अभावी अनेक दिवस घराच्या अंगणात उभी केलेली होती.
अखेरीस सायली यांनी पती व सासू सासर्यांना विचारले की, आपली घरचीच रिक्षा आहे. मी रिक्षा चालवण्यास शिकू का. घरातून परवानगी मिळाल्यावर सुरज यांनी सायलीला रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यास सुरुवात केली. प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर लायसेन्स व बॅचही मिळवून दिला. आजच्या घडीला जसवली तळा फाट्यावर सायली आपली रिक्षा व्यवसायाकरीता उभी करीत असून श्रीवर्धन तालुक्यातील पहिली महिला रिक्षाचालक म्हणून भोस्ते खेडेगावातील सायली सुरज वैराग यांच्याकडे बघितले जात आहे.