| माणगाव | प्रतिनिधी |
भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा माजी आ. जयंत पाटील यांच्या आदेशाने माणगाव तालुका शेकाप चिटणीसपदी पक्षाचे निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्ते सुरवतर्फे तळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सखाराम जाधव यांची नियुक्ती पक्षाचे जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी केली आहे. सखाराम जाधव यांना तशा आशयाचे नियुक्तीपत्र अलिबाग येथे नुकतेच पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील व जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांच्या सहिनीशी अधिकृत देण्यात आले. याप्रसंगी माजी आ.जयंत पाटील व जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी सखाराम जाधव यांचे विशेष अभिनंदन करीत त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जाधव यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
जाधव हे माणगाव तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत व प्रामाणिक ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून सर्वत्र ओळखले जातात. ते गेली 35 वर्ष तालुक्यात पक्षाचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत. ज्येष्ठ नेते जाधव हे माजी आ. जयंत पाटील यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. जाधव यांनी सुरव ग्रामपंचायतीचे 10 वर्ष सरपंच म्हणून चांगले काम केले आहे. गावातील तंटे गावपाळीवर बसून मिटवून गावात शांतता नांदण्यासाठी त्यांनी प्रयत्न करून सुरव ग्रामपंचायतीला तंटामुक्त गाव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तालुक्यात शेकापच्या माध्यमातून जाधव यांनी विविध विकासाची कामे केली आहेत.
त्यामध्ये तालुक्यातील सुरव ग्रामपंचायत हद्दीतील विविध गावांत रस्ते, पाणी योजना, वीज, स्मशानभूमी, सामाजिक सभागृह आदी विकास कामे मार्गी लावली आहेत. पक्षाची बांधणी करण्यासाठी जाधव यांचे नेहमीच मोठे योगदान राहिले आहे. त्यांनी पक्षाची ध्येय – धोरणे व पक्षाची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवली आहे. शेकाप हा गोरगरीब, कष्टकरी शेतकऱ्यांचा व जनतेचा पक्ष असल्याने या पक्षाशी जाधव हे एकनिष्ठ राहिले आहेत. जाधव यांचे पक्षाबद्दल राहिलेले योगदान व त्यांची पक्षावरील निष्ठा याकडे लक्ष देत पक्षाचे ज्येष्ठ नेते नानासाहेब सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी समाजकल्याण सभापती तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथील सभागृहात मंगळवारी (दि.22) सप्टेंबर रोजी झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाधव यांची माणगाव तालुका चिटणीसपदी अधिकृत घोषणा करण्यात आली.
पक्ष नेतृत्वाने माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास दाखवून माझी माणगाव तालुका शेकाप चिटणीसपदी निवड करून तालुक्यात पक्ष संघटना अधिकतम जोरात बांधण्याची संधी दिली. त्या विश्वासाला सार्थ ठरवून मी पक्षाचे काम आणखी जोराने करून पक्षाचे ध्येय – धोरणे, विचारधारा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून विकास कामांना चालना देऊन पक्षातील सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ व तरुण सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करेल.
सखाराम जाधव
माणगाव तालुका शेकाप चिटणीस






