। उरण । वार्ताहर ।
जेएनपीएमधील 950 कंत्राटी कामगारांच्या मागील 27 महिन्यांपासून रखडलेल्या वेतनवाढीच्या करारावर अखेरीस व्यवस्थापन आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षर्या झाल्या आहेत. यामुळे कुशल व अकुशल कामगारांना वेतनवाढीचा लाभ मिळणार असल्याची माहिती भारतीय मजदूर संघटनेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा कामगार नेते सुधीर घरत यांनी दिली.
जेएनपीए प्रशासनात विविध ठिकाणी 25 स्थानिक संस्था अनेक कामे कंत्राटी पद्धतीवर करीत आहेत. यामध्ये सुमारे 950 कुशल-अकुशल कामगारांचा समावेश आहे. मात्र, दरवर्षी पाच वर्षांत होणारा वेतनवाढीचा करार 27 महिने उलटून गेल्यानंतरही अस्तित्वात आला नाही. त्यामुळे कामगार व कामगार संघटननांचा जेएनपीए व्यवस्थापनाशी संघर्ष सुरू होता. अखेर ताळ्यावर आलेल्या जेएनपीए व्यवस्थापनाने वेतनवाढीच्या करारावर स्वाक्षर्या करण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर गुरुवारी रात्री वेतनवाढीचा करारावर दोन्ही बाजूने स्वाक्षर्या करण्यात आल्या.
1 एप्रिल 2020 ते मार्च 2025 या पाच वर्षांच्या वेतनवाढीच्या करारावर जेएनपीए व्यवस्थापनातर्फे कार्मिक विभागाच्या व्यवस्थापक मनिषा जाधव, उपव्यवस्थापक जी.बी.मोरे, भारतीय मजदूर संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, कार्याध्यक्ष सुधीर घरत, सरचिटणीस महादेव बंडा, जेएनपीटी बंदर कामगार अंतर्गत संघटनेचे सरचिटणीस भुषण पाटील, एम.एस. कोळी, खजिनदार प्रशांत भगत आणि 25 संस्थेच्या पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्यानंतर प्रत्यक्षात अस्तित्वात आला आहे. केंद्र सरकारच्या किमान वेतन कायद्याप्रमाणे कमीतकमी 23,500 ते जास्तीत जास्त 35,500 रुपयांपर्यंत वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे. तसेच बोनस, मेडिकल सुविधा, ग्रॅज्युईटी आदी सुविधाही मिळणार असल्याची माहिती कामगार नेते सुधीर घरत यांनी दिली.