निधीविना लाखो रुपयांचे वेतन रखडले
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी डॉक्टरांसह परिचारिका विनावेतन सेवा देत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचे वेतन झाले नसल्याची माहिती उघड झाली आहे. वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट उभे राहिले असून, ऐन सणासुदीत उसनवारीवर काम चालत आहे. महिन्याच्या खर्चाचा ताळमेळदेखील बिघडला आहे. शासनाकडून निधी न आल्याने हे वेतन रखडल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. 50 लाख रुपयांच्या निधीची गरज असल्याचे बोलले जात आहे.
अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील इमारत 40 वर्षांहून अधिक वर्षांची असून, या इमारतीमध्ये अडीचशे खाटांचे रुग्णालय आहे. या रुग्णालयात हजारोंच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. शहरी भागासह ग्रामीण भागातील खेड्यातील रुग्ण रुग्णालयात येतात. रुग्णालयात रुग्णांची संख्यादेखील प्रचंड वाढू लागली आहे. वाढत्या रुग्णांच्या संख्येने नियमित डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचार्यांवर कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर व परिचारिकांची नेमणूक केली जाते. अकरा महिन्यांच्या करारावर ही नियुक्ती करण्यात आली आहे. अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात 25 परिचारिका व 15 डॉक्टर रुग्णांना सेवा देण्याचे काम करीत आहेत. मात्र, त्यांचे वेतन वेळेवर मिळत नसल्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा रुग्णालयातील परिचारिका व डॉक्टरांचे जुलै व सप्टेंबर महिन्याचे मानधन मिळाले नसल्याची माहिती रुग्णालयातून उपलब्ध झाली आहे. शासनाकडून निधी न आल्याचा फटका यांना बसत आहे. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणार्या वेतनासाठी आता दोन ते तीन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. वेतन मिळत नसल्याने घरखर्च चालविणेदेखील कठीण होऊन बसले आहे. महिन्याचा आर्थिक ताळमेळ बिघडला असून, अनेकांवर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. शासनाकडून 50 लाखांहून अधिक रुपयांचा निधी न आल्याने वेतन रखडल्याची माहिती रुग्णालयातील प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे.
शासनाकडून निधी नियमित वितरीत करण्याबाबत प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे कंत्राटी डॉक्टर व परिचारिकांचे वेतन थांबले आहे. ही प्रक्रिया नियमित झाल्यावर वेतनाचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल.
अंबादास देवमाने,
जिल्हा शल्यचिकित्सक







