गटारावरील झाकणांची दुरवस्था
। पाताळगंगा । प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील निगडोली गावातील घरातून निघणारे सांडपाण्यासाठी भुयारी गटाराचे काम तीन वर्षापूर्वी पूर्ण झाले. घरातून निघणारे सांडपाणी रस्त्यावर येत असल्यामुळे या ठिकाणी वाहनचालकांना खूप त्रास सहन करावा लागत होता. शिवाय वाहन घसरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे या ठिकाणी भुयारी गटारे बांधण्यात आली. मात्र वाहनांची सातत्याने वर्दळ असल्यामुळे या ठिकाणी बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळीच्या झाकणांची दुरवस्था निर्माण झाल्यामुळे अपघताला निमंत्रण मिळत आहे.
निगडोली येथून खोपोली जाण्याचा मार्गनजीक असल्यामुळे या परिसरातील शेकडो नागरिक याच मार्गाचा अवलंब करीत आहे. परिणामी या रस्त्यावर बांधण्यात आलेले आरसीसी भुयारी गटार आता अपघातांचे केंद्रबिंदु बनत आहे. अनेक ठिकाणी लोखंडी जाळी बसविण्यात आली असून वाहनांच्या वर्तळामुळे यांची दुावस्था निर्माण झाली आहे.
येथील काही तरुणांनी या ठिकाणी जाळी खराब झाली म्हणून यामध्ये झाडाच्या फांद्या ठेवल्या असून यामुळे वाहनचालकांना त्याठिकाणी खड्डा असल्याचे निदर्शनास येताच अपघातावर नियंत्रण करणे सोपे जात आहे. नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी बांधण्यात आलेल्या भुयारी गटारांमुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या गटारावरील तुटलेल्या जाळीचे लवकरात लवकर काम करावे अशी मागणी येथील ग्रामस्थ आणि वाहनचालक करीत आहेत.