| रेवदंडा | वार्ताहर |
अलिबाग आणि मुरुड तालुक्यांना जोडणारा महत्त्वपूर्ण दुवा म्हणून ओळख असलेल्या साळाव पुलाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या पुलाखालून मालवाहतूक बार्जची दिवस-रात्र नित्याने ये-जा सुरू असून, बार्जच्या धक्क्यांमुळे पूल खिळखिळा होत आहे. त्यामुळे पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, ही धोकादायक मालवाहतूक तात्काळ बंद करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.
दरम्यान, यााबत रेवदंडा बंदर निरीक्षक सतीश देशमुख यांच्याशी संपर्क केला असता, या मालवाहतूक बार्जमधून कोळशाची वाहतूक होत आहे. हा कोळसा इंडो एनर्जी प्रा.लि. ही कंपनी सानेगाव येथील जेटीवर उतरवून घेते. ही वाहतूक मेरीटाईम बोर्डाच्या शासकीय परवानगीने होत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, या पुलाखालून जा-ये करत असलेल्या कोळसा वाहतूक करणार्या मालवाहतूक बार्जचे नित्याने पुलास धक्के बसत असून, त्यामुळे पूल कमकुवत होत असल्याची तक्रार करण्यात आली असता, सतीश देशमुख यांनी मी नुकताच येथे रूजू झालो असून, याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.
साळाव पुलाचे खालून रात्रीचे वेळीस सुध्दा कोळसा वाहतूक होत असते, व इंडो एनर्जी प्रा.लि. कंपनी हा कोळसा सानेगाव जेटीवर उतरवून घेते. मात्र कोळसा वाहतूक करणारा बार्ज काळोख्या रात्रीचे वेळेस पुलाचे खालून जाताना, पुलाच्या पिलरना जोरदारपणे धडकत असल्याची बाब अनेक स्थानिकांचे व प्रवासीवर्गाचे निदर्शनास आली आहे. पुलाच्या सुरक्षेचा विचार करता, संबंधित खात्याने इंडो एनर्जी प्रा.लि कंपनीची साळाव पुलाचे खालून मालवाहतूक बार्जद्वारे होत असलेली कोळसा वाहतूक त्वरित बंद करुन संरक्षण द्यावे, अशी मागणी स्थानिक करत आहेत.