वेबसाईट तयार करणारी पहिली ग्रामपंचायत
| रेवदंडा | प्रतिनिधी |
स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानामध्ये सक्रिय सहभागामुळे, साळाव ग्रामपंचायत सध्या तालुक्यात चर्चेत आहे. या दोन्ही महत्त्वपूर्ण योजनांच्या पूर्ततेसाठी ग्रामपंचायतीत अनेक अभिनव उपक्रम राबवले जात आहेत. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून, तालुक्यातील साळाव ग्रामपंचायतीने डिजिटल युगात एक अभिनव पाऊल टाकले असून, ही ग्रामपंचायत मुरुड तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये स्वतःची अधिकृत वेबसाईट तयार करणारी पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
मुरूड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी खताळ यांच्या हस्ते सोमवारी (दि.6) साळाव ग्रामपंचायतीच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. हा सोहळा साळाव ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला. यावेळी बोलताना गट विकास अधिकारी खताळ यांनी या डिजिटल उपक्रमाचे विशेष कौतुक केले. ते पुढे म्हणाले की, मुरुड तालुक्यासाठी हा एक मैलाचा दगड आहे. स्मार्ट ग्राम व समृद्ध पंचायत अभियानांतर्गत अशा डिजिटल सुविधा अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. ग्रामपंचायतीच्या salavpanchayat.org या संकेतस्थळामुळे ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजना, आवश्यक दाखले आणि ग्रामपंचायतीच्या काशांची माहिती तज्ञत्काळ उपलब्ध होईल. ठयामुळे प्रशासनात पारदर्शकता वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमासाठी सरपंच वैभव कांबळी, उपसरपंच दिनेश बापलेकर, ग्रामसेवक आशा बिरवाडकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







