भाडेत्वावर घेतलेली कारची विक्री


कळंबोली पोलिसांकडून शोध सुरु
पनवेल । वार्ताहर ।
कळंबोलीत राहणार्‍या ओमप्रकाश उपाध्याय नामक व्यक्तीने प्राईम मुवर मोबॅलिटी टेक्नॉलजिस प्रा.लि. या कंपनीकडून 21 लाख रुपये किंमतीची इनोव्हा क्रिस्टा कार एक वर्षाच्या भाडेतत्वावर घेऊन कंपनीला कारचे भाडे न देता, सदर कार परस्पर दुसर्‍या व्यक्तीला विकल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. तसेच दुसर्या व्यक्तीने देखील ती कार तिसर्या व्यक्तीला विकल्याचे उघडकिस आले आहे. त्यामुळे कळंबोली पोलिसांनी या प्रकरणात ओमप्रकाश उपाध्याय याच्यावर फसवणुकिचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

या प्रकरणातील आरोपी ओमप्रकाश उपाध्याय याने गत डिसेंबर महिन्यामध्ये भाडेतत्वावर कार देणाऱया प्राईम मुवर मोबॅलिटी टेक्नॉलजिस प्रा.लि. कंपनीला संपर्क साधुन 1 वर्षाच्या भाडेत्वावर इनोव्हा क्रिस्टा कारची मागणी केली होती. सदर कंपनीने 46,720 रुपये महिना भाडेतत्वावर सदरची कार उपाध्याय याला कळंबोली येथे नेऊन दिली होती. त्यावेळी कंपनीच्या प्रतिनिधीने उपाध्याय याच्या कागदपत्रांची खातरजमा करुन करार पत्रावर त्याच्या सह्या घेतल्या होत्या. सदर कार घेतल्यानंतर उपाध्याय याने सुरुवातीचे दोन महिन्याचे कारचे भाडे कंपनीला पाठवून दिले. मात्र त्यानंतर त्याने कारचे भाडे देणे बंद केले. त्यामुळे कंपनीच्या वसुली अधिकार्यांनी उपाध्याय याच्याकडे कारबाबत चौकशी केली असता, त्याने सदरची कार राजेशकुमार सामंतराय याला भाडेतत्वावर दिल्याचे सांगितले.

त्यानंतर कंपनीच्या वसुली अधिकार्‍यांनी त्यांच्या कारचा शोध घेतला असता, त्यांची कार सांगली येथील कुमार सावंत याच्याकडे असल्याचे त्यांना समजले. तसेच त्याला राजेशकुमार याने सदरची कार विकल्याची माहिती मिळाली. दरम्यान, ओमप्रकाश उपाध्याय याने भाडे तत्वावर घेतलेल्या कारचे महिन्याचे भाडे न भरता 21 लाख रुपये किंमतीची इनोव्हा क्रिस्टा कार त्याने परस्पर दुसर्‍याला विकून कंपनीचा विश्‍वासघात केल्याचे आढळुन आल्यानंतर कंपनीच्या वसुली अधिकार्‍यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी उपाध्याय याच्यावर फसवणुकिचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

Exit mobile version