लहान बालकाची चार लाखाला विक्री

कामोठ्यातील डॉक्टर अटकेत
पनवेल | वार्ताहर |
लहान बाळाची अवघ्या चार लाखात विक्री करणार्‍या डॉक्टरला कामोठे पोलिसांनी वसाहतीमधून रंगेहात पकडून गजाआड केले आहे. त्या सोबत बाळाला विक्रीसाठी घेऊन आलेल्या महिलांना देखील पोलिसांनी अटक करून गजाआड केले आहे. ही घटना कामोठे वसाहती मधील असून या डॉक्टर चे या वसाहतीमध्ये स्वतःचे क्लीनिक आहे.
पंकज गोपालराव पाटील हे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. पंकज पाटील यांनी स्त्री जातीच्या लहान बाळाचा सौदा करून अवघ्या चार लाखाला त्याची विक्री केली होती. सध्या हा डॉक्टर कामोठे पोलिसांच्या ताब्यात आहे. कामोठे सेक्टर 8 मधील फॅमेली हेल्थ केअर नावाने दवाखाना चकवणारा डॉक्टर एका लहान बाळाची 4 लाखला विक्री करणार असल्याची माहिती, कामोठे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महाला यांना मिळाली होती, या मिळालेल्या माहिती ची महाला यांनी खाजगी पद्धतीने खातरजमा करून घेतली असता, डॉक्टर पंकज पाटील हे 4 लाखात एका बाळाची विक्री करणार असल्याची खात्री झाली या मिळालेल्या माहिती नुसार, महाला यांनी या डॉक्टर ला अटक करण्यासाठी सापळा रचला, त्या नुसार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस नाईक मंथन पाटील यांना मदतीला घेतली आणि या घटनेची माहिती दिली आणि ठरलेल्या प्लानिग नुसार खाजगी पंच आणि खबर देणारा इसम व पोलीस नाईक मंथन पाटील या बाळाची खरेदी करण्यासाठी स्वतः पंकज पाटील यांच्या दवाखान्यात गेल्या, त्या वेळी डॉक्टर पाटील यांनी सांगितलेल्या 4 लाखाची रक्कम देखील सोबत घेऊन गेल्या. या 4 लाखात पोलिसांनी काही बनावट नोटा लावून 4 लाखाची रक्कम जमा करून ते सोबत गेले. या वेळी डॉक्टर सोबत जाऊन पैशे दाखवून बाळाची विचारणा केली, त्या वेळेस डॉक्टर ने रक्कम पाहून बाळाला विकणार्‍या महिलेला फ़ोन केला आणि क्लीनिक मध्ये येण्यास सांगितले, त्यानुसार तळोजा मध्ये राहणार्‍या तीन महिला अवघ्या 10 मिनिटात स्त्री जातीच्या लहान बाळाला घेऊन त्या क्लीनिक मध्ये आल्या आणि ठरलेल्या व्यवहारानुसार डॉ पंकज पाटील यांनी पैसे घेतले, आणि बाळ त्याच्या स्वाधीन केले आणि जण्यास सांगितले, या वेळी विक्री साठी आलेल्या महिला बाळाला देऊन बाहेर पडल्या या वेळी, क्लीनिकच्या बाहेर दबा धरून बसलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक महाला यांच्या पथकांनी या महिलांना जागेवर थांबवून अटक केली, आणि डॉक्टर ला देखील अटक केली, आणि यासाठी डॉक्टरने घेतलेल्या रक्कम देखील ताब्यात घेऊन डॉक्टर सह त्या महिलांना पोलिसांनी अटक करून गजाआड केले आहे.

Exit mobile version