। पनवेल । वार्ताहर ।
लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने काळा सोनेरी रंगाचा दगड रेडिओक्टिव्ह स्टोन या नावाने विक्री करण्याचा प्रयत्न करणार्या दोघांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल सत्तार अब्दुल रहीम (वय 52 रा.कर्नाटक) व मोहम्मद तनवीर शब्बीर खान (वय 32 रा.तेलंगणा) अशी दोघांची नावे आहेत.
काळ्या सोनेरी रंगाचा दगड रेडिओक्टिव्ह स्टोन या नावाने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा, नवी मुंबई यांना मिळाली होती. त्यानुसार पार्थ हॉटेल, सेक्टर 6, कामोठे येथे पोलिसांनी सापळा रचला. यावेळी पार्थ हॉटेल समोर येणार्या रस्त्यावर दोन इसम पायी चालत असताना दिसून आले. त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे काळ्या सोनेरी रंगाचे दगड सापडून आले. यावेळी त्यांनी हे दगड विक्री करण्यासाठी आणले असल्याचे सांगून हे दगड रेडियो एक्टिवा या नावाने मोठ्या रकमेत विक्री करून फसवणुकीच्या इराद्याने आणले असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना दगडांसह अटक केली.