मुंबईतील टोळीचा पर्दाफाश
। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत चालला आहे. त्यात शहरात लसीकरणाचा वेग वाढवला आहे. मात्र अशातच लसीकरणाच्या सर्टिफिकेट संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.
कोरोना लसीचे बनावट सर्टिफिकेट बनवणार्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. गोरेगाव परिसरात मोठी कारवाई करत गुन्हे शाखेच्या पथकानं दोन आरोपींना अटक केली आहे. गोरेगाव पश्चिम भागातील काही तरुण कोरोना लसीच्या दोन्ही डोसचे बनावट सर्टिफिकेट बनवण्याचे काम करत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाली. ही टोळी कोरोना लसीच्या दोन्ही डोसचे बनावट प्रमाणपत्र बनवून फसवणूक करत होती. याचा सुगावा मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने बीएमसीच्या पथकासह गोरेगाव परिसरात छापा टाकला आणि तेथून दोन आरोपींना अटक केली.
आतापर्यंत या लोकांनी एकूण 70 ते 75 जणांना कोरोना लसीकरणाची बनावट प्रमाणपत्रे विकली आहेत. बनावट प्रमाणपत्राच्या बदल्यात ही टोळी लोकांकडून 1500 रुपये घ्यायची. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, लसीचे बनावट प्रमाणपत्र बनवण्याचा हा धंदा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होता. या कारवाईनंतर या दोन आरोपींशिवाय या टोळीत आणखी कोण-कोण सामील आहेत आणि या टोळीने आतापर्यंत किती लोकांची अशा प्रकारे बनावट सर्टिफिकेट बनवून फसवणूक केली आहे, याचा शोध घेण्यामध्ये गुन्हे पथक गुंतले आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.