बनावट मालकाडून जमिनीची विक्री; चौघांवर गुन्हा दाखल

| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील धामोते येथे असलेली चार एकर जमिनीची बनावट मालक यांच्या सहाय्याने विक्री करण्यात आली आहे. त्याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे चौघांवर गुन्हा दाखल झाला असून, सर्वजण फरारी आहेत. नेरळ पोलीस ठाणे हद्दीत कर्जत येथील दुयम निबंधक कार्यालय यांनी आपसात संगनमत करुन मुंबई वरळी येथील कमल प्रदीप कोठारी यांची मालकीची जमीन विकली आहे.कोठारी यांची धामोते गावाच्या हद्दीत असलेली सर्व्हे नंबर 69 चा हिस्सा नंबर 4 मधील एक हेक्टर 59 गुंठे, म्हणजे साधारण चार एकर जमिनीची फेब्रुवारी 2022 रोजी जमिनीचे बोगस महिला मालक यांच्या सहाय्याने विक्री करण्यात आली. जमिनीच्या मूळ मालक कमल कोठारी यांच्या अपरोक्ष खरेदीखताचे बनावट आणि बोगस दस्त तयार करुन सदरचे दस्त कर्जत येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत केले. या प्रकारात मिलिंद मनोहर देसाई, अनोळखी इसम, नेरळ येथील सुरेश रतन राजमुतक आणि उत्तर प्रदेश राज्यातील शनी बाबू शेट्टी यांचा समावेश होता.

दुयम निबंधक कर्जत यांच्या कार्यालयामध्ये या खरेदीखताचे दस्त नोंदणीकृत करुन घेताना खरेदीखत बोगस मालक मिलिंद मनोहर देसाई यांनी व खरेदीखत बोगस अनोळखी महिला यांनी डुप्लिकेट आधार कार्ड, पॅनकार्ड यांच्या सहाय्याने दस्त नोंदवून जमिनीची बेकायदा विक्री केली. त्या जमिनीच्या मूळ मालक कमल कोठारी या आपणच असल्याचे भासवून त्या अनोळखी महिलेने दुय्यम निबंधक यांची खात्री पटवून दस्ताची नोंद केली आणि तेथून पळ काढला. या दस्ताची नोंद कर्जत दुयम निबंधक कार्यालय कर्जत यांचे कार्यालयामध्ये दस्त क्रमांक 505/2022 दि. 10/02/2022 अन्वये नोंदणीकृत करुन घेऊन फिर्यादीचा विश्‍वासघात करुन फसवणूक केली आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदशनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरीश भालचिम हे करीत आहेत. या बनावट जमीन घोटाळाप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

Exit mobile version