ड्राय डे दिवशी दारूची चढत्या दरात विक्री

। उरण । वार्ताहर ।
राज्यात ड्राय डे असला तरी उरणमध्ये दारूची विक्री होत असल्याचे चित्र पहावयास मिळते. त्यामुळे ड्राय डे असो वा नसो पण उरणमध्ये दारूची विक्री सुरूच असते. इतर दिवसापेक्षा ड्राय डे च्या दिवशी जास्त धंदा होत असल्याचे दारू विक्रेते सांगतात. मात्र त्यांच्यावर उत्पादन शुल्क अथवा पोलिसांकडून कारवाई झाल्याचे दिसत नाही. उरणमधील वाईन शॉप मधून तालुक्यातील अनेक गावोगावी खासगी वाहनातून घरपोच दारूचा माल पोहचविला जात आहे. उरण परिसरातील जेएनपीटी, द्रोणागिरी व तालुक्यातील इतर ठिकाणी असलेल्या छोट्या मोठ्या कँटिंगमध्ये मद्यपान करण्यास मनाई असताना देखील परिसरातील कँटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात मद्यपान केले जात आहे. विशेष म्हणजे कँटिंग चालकच मद्य पुरवठा करताना दिसत आहेत. त्यामुळे अशा प्रकारे बेकायदेशीर धंदे करणार्‍यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी गस्त घालावी व अशा हॉटेल व बारचालकांवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जावूनही कारवाई होत नाही. ज्या दिवशी ड्राय डे असतो त्यादिवशी छुप्या पद्धतीने चढत्या भावाने दारूची विक्री होत असते. यामध्ये ओरिजनल ब्रँडच्या नावाखाली बनावट दारूची सर्रासपणे विक्री होत आहे. त्यामुळे इतर दिवसापेक्षा कमाई जास्त होत असल्याचे दारू विक्रेते सांगतात. याची माहिती उत्पादन शुल्कच्या येथील काही अधिकारी वर्गाना माहिती असूनही त्यांचा यथोचित पाहुणचार होत असल्याने ते याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा उरण परिसरात सुरू आहे.

Exit mobile version