नायलॉन मांजाची बाजारात विक्री

| पनवेल । वार्ताहर ।
मकरसंक्रांतीला काही दिवस बाकी असले तरी ख्रिसमसची सुट्टी लागताच पतंगांचा मोसम सुरू होतो. अशातच बंदी असलेल्या नायलॉन मांजाची बाजारात खुलेआम विक्री होत आहे. या मांजामुळे पशू-पक्ष्यांसोबत अनेक दुचाकी चालकांच्या जीवावर बेतले असल्याने आकाशातील हा मृत्यूचा दोर घातक ठरण्याची शक्यता आहे. ख्रिसमसची सुट्टी लागल्याने सध्या मैदानांवर पंतगबाजीला सुरुवात झाली आहे. पतंग उडवण्याचा मोह हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच होतो. त्यामुळे ग्रामीण भागात पतंग उडवणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे, पण पतंग उडवण्याचा हा आनंद कोणासाठी तरी जीवघेणादेखील ठरत आहे.

अशातच बाजारात बंदी असलेल्या नायलॅान मांजाची विक्री होत असल्याने पशू-पक्ष्यांसोबत वाहनचालकांच्या जीवालाही घोर लागला आहे. तसेच महावितरणाच्या लघु व उच्चदाबाच्या वाहिन्यांमध्ये अडकलेला पतंग काठ्या, लोखंडी सळी किंवा गिरगोट यांच्या माध्यमातून काढण्याचा मोह पण जिवावर बेतण्याची शक्यता आहे. त्यामुळे सणासुदीतील आनंदाला गालबोट लागू नये, याकरिता पतंग उडवताना पुरेपूर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

वाहनचालकांना धोका
धातूमिश्रित नायलॉन मांजामुळे रस्त्याने जाणार्‍या वाहनचालकांच्या गळ्यात अडकून अनेकदा इजा होण्याचे प्रकार झाले आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांना पतंग उडवण्यासाठी मांजा घेऊन देताना पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे. कोणताही अपघात होण्यापूर्वी तो होऊच नये यासाठी काळजी घेतलेली अधिक योग्य आहे.

Exit mobile version