| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानचे भूमिपुत्र हुतात्मा विठ्ठलराव लक्ष्मण कोतवाल यांची 83 वी पुण्यतिथी शुक्रवारी (दि.2) नौरोजी उद्यानात साजरी करण्यात आली. पहाटे साडेपाच वाजता नौरोजी उद्यानातून मशाल फेरी काढण्यात आली. सकाळी 6 वाजता विद्यमान नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या हस्ते पुण्यज्योत प्रज्वलित केल्यावर उपस्थितांच्या हस्ते हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. नगरपालिका प्राथमिक शाळेच्या आणि गव्हाणकर शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते सादर केली.
यावेळी दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद तसेच आजी माजी लोकप्रतिनिधी, विविध मंडळाचे, संस्थाचे पदाधिकारी, व्यापारी बंधू, ग्रामस्थ नागरिक, नगरपरिषद कर्मचारी वर्ग उपस्थित होते. छ. शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्याला मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या हस्ते पुष्पहार, स्वातंत्र्य सैनिकांच्या स्तंभास नगरसेवक सुनील शिंदे, नगरसेविका ऐश्वर्या शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर वीर हुतात्मा भाई कोतवाल नगरपरिषद प्राथमिकशाळेत, वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या निवासस्थानी, हुतात्मा स्मारक येथील हुतात्मा भाई कोतवाल यांच्या प्रतिमेस आणि हुतात्मा स्मारक येथील अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयातही हुतात्मा भाई कोतवाल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.







