| अलिबाग | वार्ताहर |
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा अलिबागतर्फे दरवर्षीप्रमाणे ‘सन्मान सावित्री संघर्षाचा’ हा कार्यक्रम शनिवारी (दि.29) अलिबाग येथील सार्वजनिक वाचनालय डोंगरे हॉल येथे घेण्यात आला. ज्या महिलांनी अकाली आलेल्या वैधव्यानंतर खचून न जाता अतिशय कष्टपूर्वक विविध अडचणींना तोंड देऊन आपल्या मुलांना वाढविले, त्यांना उत्तम शिक्षण दिले, अशा वीस सावित्रींचा प्रशस्तीपत्र देऊन पाहुण्यांच्या आणि ज्येष्ठ अंनिस कार्यकर्त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी काही महिलांनी आपले मनोगत मांडून आपला जीवन संघर्ष श्रोत्यांसमोर मांडला.
या कार्यक्रमात शुभांगी जोगळेकर कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या. प्रमुख वक्त्या, निवृत्त विज्ञान शिक्षिका माधवी कुलकर्णी यांनी विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराच्या गरजेविषयी प्रबोधनात्मक विचार मांडले. जगभर स्त्रियांना आपल्या हक्कांसाठी झगडून विविध संकटांवर कशी मात करावी लागते याचे त्यांनी सोदाहरण स्पष्टीकरण दिले. प्रमुख पाहुण्या जिल्हा ग्रंथालयाच्या कार्याध्यक्षा, शैला पाटील यांनी मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे आजच्या कुटुंबसंस्थेवर होणाऱ्या विपरीत परिणामांची सोदाहरण माहिती देऊन, उपस्थित श्रोत्यांना, कुटुंबात उत्तम संस्कार करण्याचे महत्त्व विशद केले. या कार्यक्रमाचे वेळी मेघना म्हात्रे यांनी प्रबोधनपर गीतांचे गायन केले. तर, स्नेहल आंब्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुरभी संस्थेमार्फत महिला कल्याणाच्या शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. सुरेखा पाटील यांनी शेवटी आभार मानले. या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विविध कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.