। कर्जत । वार्ताहर ।
राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 मसुद्यात राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य, यांनी मनुस्मृतीचे समर्थन करणारा अभ्यासक्रम आराखडा नुकताच जाहीर केलेला आहे, त्याचा निषेध म्हणून सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात निवेदन देण्यात आले.
परिषदेने अभिप्रायासाठी जाहीर केलेला राज्य अभ्यासक्रम आराखडा 336 पानांचा आहे. तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक गुणवत्ता वाढीसाठी हा आराखडा बनवला आहे. त्यावर अभिप्राय मागवण्यात आला आहे. हा अभिप्राय 3 जून पर्यंत कार्यालयात सादर करायचा आह. हा कालावधी अत्यंत छोटा आहे. तो कालावधी 15 ऑक्टोबर पर्यंत वाढवावा अशी मुख्य मागणी सम्यकने केली. घाईघाईत आराखडा मंजूर न करता, त्यावर निकोप चर्चा घडवून आणायला हवी, त्यानंतरच त्याला अंतिम स्वरूप द्यावे. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी त्यांच्या निरागसतेशी परिषदेने खेळू नये. मनुस्मृतीचा आधार घेणार्यांचा सम्यक निषेध करते. संविधान मूल्यांच्या आधारावर राज्याचा शैक्षणिक आराखडा तयार करावा, असे आवाहन सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने करण्यात आले आहे.






