| पोलादपूर | वार्ताहर |
पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिल जाधव आणि पोलीस कर्मचारी तसेच, गोरखा निमलष्करी दलाच्या दोन प्लॅटून्सचे दुपारी साडेतीन वाजता तालुक्यातील कापडे आणि चार वाजता पोलादपूर शहरामध्ये 40 अंश तापमानात संचलन करण्यात आले.
पोलादपूर तालुक्यात नागरिकांनी निर्भयपणे मतदान करण्यासाठी प्रवृत्त व्हावे यासाठी पोलादपूर पोलीस ठाण्याचे निरिक्षक अनिल जाधव आणि सहकारी तसेच गोरखा निमलष्करी दलाच्या दोन प्लॅटून्सद्वारे संचलन करून निवडणूक सुसज्जता दर्शविण्यात आली. दुपारी टळटळीत उन्हात गोरखा निमलष्करी दलाचे दोन सशस्त्र प्लॅटून्स आणि पोलादपूर पोलीस ठाण्याचे सुमारे 20 हून अधिक कर्मचारी या संचलनामध्ये सहभागी झाले. कापडे येथे महाबळेश्वर रस्ता आणि कापडे कामथे रस्त्यावर संचलन केल्यानंतर हे सर्व पोलीस आणि निमलष्करी दलाचे गोरखा जवान पोलादपूर येथील जुना महाबळेश्वर रस्त्यावरून पिंपळपार मारूतीजवळून भैरवनाथ नगर सहाणेवर गेले. तेथून आनंदनगर येथून युनियन बँकेलगतच्या रस्त्यावरून मुख्य बाजारपेठेतून महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळयाजवळून सैनिकनगरमार्गे संचलन करून या गोरखा प्लॅटून्सना पुढील शहरामध्ये संचालनासाठी निरोप देण्यात आला. संचलन सुरू असताना कापडे आणि पोलादपूर शहरामध्ये तापमानाचा पारा तब्बल 40 अंशावर पोहोचला होता.