तहसीलदारांची जीप जप्त केल्याचा धक्कादायक प्रकार
। छ. संभाजीनगर । प्रतिनिधी |
छत्रपती संभाजीनगरातून एक भयंकर घटना समोर आली आहे. चक्क पोलीस कर्मचार्याकडूनच वाळूची तस्करी केली जात असून, कारवाई करणार्या तहसीलदारांनाच धमकावून या पोलीस कर्मचार्यासह सुमारे 150 वाळूतस्करांनी राडा घालण्यात आला. विशेष म्हणजे या संदर्भात तक्रार देण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांची तक्रार घेण्याऐवजी तेथील पोलीस उपनिरीक्षकाने तहसीलदारांची सरकारी जीप जप्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पोलीस आयुक्तांशी चर्चा करून त्या पोलीस उपनिरीक्षकासह वाळूतस्कर असलेल्या पोलीस कर्मचार्यावर कारवाई करण्यासंदर्भात पत्र दिले आहे.
छत्रपती संभाजीनगरात वाळू माफियांवर कारवाईसाठी आलेल्या महसूल अधिकारी-कर्मचार्यांना जीवे मारण्याच्या घटना घडत आहेत. मात्र, कायद्याचा रक्षक असलेल्या पोलीस कर्मचार्यानेच वाळू तस्करी सुरु करीत तहसीलदारांना थेट आव्हान दिल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या अहवालानुसार तहसीलदार रमेश मुंडलोड गुरुवारी (दि.4) रात्री जात असताना त्यांना गारखेडा परिसरात वाळू वाहतूक करणारा हायवा निदर्शनास आला. त्यांनी या हायवाला थांबवून वाळू रॉयल्टी भरणा केल्याची पावती मागितली. त्यावर वाहनचालकाने रॉयल्टी नसल्याचे सांगितले आणि हायवाचे मालक पोलीस कर्मचारी पवार असल्याचे सांगितले.
दरम्यान, रॉयल्टी नसल्याने तहसीलदारांनी तलाठी आणि मंडळ अधिकार्यांना घटनास्थळी बोलावून घेतले आणि हायवा जप्त करुन तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नेण्याचे निर्देश दिले. तहसीलकडे जात असताना हडकोतील पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ पवार आणि सुमारे 150 वाळू माफिया आले होते. त्यांनी हायवासह तहसीलदारांची जीप थांबविली. त्यानंतर तहसीलदारांना अरेरावी करीत पवार यांनी आपण पोलीस कर्मचारी आहोत, असे म्हणत त्यांना शिवीगाळ करीत धमकावणे सुरु केले. हा राडा सुरु असताना तेथून हायवा पळवून नेण्यात आला. त्यानंतर रात्री 10.30 वाजता तहसीलदारासह महसूल कर्मचार्यांनी जिन्सी पोलीस ठाणे गाठले. तत्पूर्वीच ते पोलीस कर्मचारी 150 वाळू तस्करांसह येथे आलेले होते.
दरम्यान, जिन्सी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक यांना घटनेची माहिती देत तक्रार घेण्याबाबत सांगितले. मात्र, वाळूतस्कर पवार हे पोलीस कर्मचारी असल्याने त्या उपनिरीक्षकांनीही तक्रार घेण्यास चक्क नकार दिला व त्यांनी थेट तहसीलदार मुंडलोड यांच्या जीपची चावी काढून घेत त्यांना बसवून ठेवले. त्यानंतर रात्री 1 वाजेपर्यंत हा ड्रामा सुरु होता. या वाळूतस्कर पोलीस कर्मचारी आणि जिन्सी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकांनी केलेल्या धाडसामुळे अख्खे महसूल प्रशासन सुन्न झाले आहे.
या घटनेनंतर तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी शुक्रवारी घटनेचा अहवाल सादर केला. त्यानुसार पोलीस आयुक्तांशी घटनेबाबत चर्चा करण्यात आली. जिन्सी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आणि वाळू तस्कर पोलीस कर्मचार्यावर कारवाई करण्यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे. या संदर्भात पोलीस आयुक्तांकडून कारवाई केली जाणार आहे. कारवाई न झाल्यास आपण स्वतः या प्रकरणी कारवाई करणार.
दिलीप स्वामी,
जिल्हाधिकारी