ग्रामस्थांचे उपोषण मागे…
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून 2020 मध्ये कार्यादेश देण्यात आलेल्या रस्त्याचे काम अद्याप बंद आहे. खांडपे-तिवने-सांडशी हा रस्ता ठेकेदार कंपनी कडून खोदून ठेवण्यात आला आहे. या रस्त्याच्या त्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंता यांनी उपोषणाचा इशारा देणारे सुधाकर घारे यांची भेट घेवून मे 2023 पूर्वी काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने या तिन्ही गावातील ग्रामस्थांनी उपोषण स्थगित केले आहे.
कर्जत तालुक्यातील खांडपे-तिवने-सांडशी या सव्वा चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाले होते. सदर रस्त्याचे काम दोन कोटी 65 लाख रुपये खर्च करून करण्यात येणार होते आणि त्या कामाचे कार्यादेश जानेवारी 2021 मध्ये देण्यात आले होते. रस्त्याच्या कामाचा ठेका नवी मुंबई येथील श्री सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन या कंपनीने घेतला असून, संबंधित ठेकेदाराने रस्ता बनविण्यासाठी खोदून ठेवला आणि त्यानंतर दोन पावसाळे लोटले आहे. रस्ता खोदून ठेवल्याने ग्रामस्थांना त्या रस्त्याने कोणतेही वाहन नेता येत नव्हते. परिणामी तिन्ही गावातील ग्रामस्थांचे हाल होत असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांची भेट घेवून ठेकेदाराला कामाबद्दल जाब विचारा अशी विनंती केली. घारे यांनी काही दिवसांपूर्वी सर्व ग्रामस्थ यांच्यासह खोदलेल्या रस्त्यावर ठिय्या मांडून सात दिवसात रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर सर्व ग्रामस्थ आणि आपण स्वतः उपोषणाला बसू असा इशारा दिला होता.
त्याचवेळी सुधाकर घारे यांच्याकडून त्या उपोषणाची तयारी कर्जत तहसील कार्यालयाबाहेर सुरू झाली होती. तसेच तिन्ही गावातील शेकडो ग्रामस्थ उपोषणाला एकच वेळी बसणार असल्याने प्रशासन देखील सतर्क झाले होते. शेवटी महाराष्ट्र ग्रामीण यंत्रणेचे रायगड विभाग कार्यकारी अभियंता संजय कुमार मंत्री यांनी लेखी निवेदन देवून उपोषण करू नये असे आवाहन केले. त्याचवेळी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असल्याने तालुक्यातील ग्रामस्थांचे उपोषण होऊ नये अशी विनंती कार्यकारी अभियंता यांच्याकडून करण्यात आले. तर त्या पत्रामध्ये संबंधित रस्त्याचे काम मे 2023 पर्यंत पूर्ण केले जाईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता यांनी दिले आहे. महाराष्ट्र ग्रामीण विकास यंत्रणेकडून पत्र देण्यात आल्याने आणि त्या रस्त्याचे काम देखील सुरू केले असल्याने स्थगित केले असल्याचे सुधाकर घारे यांनी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर केले आहे.