। सांगोला । प्रतिनिधी ।
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव राबवण्यासाठी सांगोला तालुक्यातील सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. 13 ते 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण सांगोला शहर व तालुका तिरंगामय होणार असल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तालुक्यातील सुमारे 52 हजार कुटुंब व शहरातील 8 हजार कुटूंबाच्या घरावर तिरंगा दिमाखात फडकणार आहे. बैठकीस पो. नि. अनंत कुलकर्णी, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना तहसीलदार म्हणाले की, 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या कालावधीत तालुक्यातील सर्व घंटागाडी व ग्रामपंचायतच्या स्पीकर वरून हर घर तिरंगाफ कार्यक्रमाबद्दल माहिती दिली जाणार आहे. तसेच मोठ्या गावात व शहरातही प्रसिद्धी दिली जाणार आहे. दिनांक 9 ऑगस्ट रोजी तालुक्यातील मुख्यालय व तालुक्यातील प्रमुख गावातील प्रमुख रस्त्याच्या कडेला तालुक्यातील अमर वीर व हुतात्मे यांच्या कार्याची माहिती तसेच तालुक्यातील स्वातंत्र्यकालीन माहिती लावण्यात येणार आहे.
10 ऑगस्ट रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून यामध्ये देशभक्तीपर गीते व नृत्य आदी तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत. 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट यामध्ये महाविद्यालयाचे कलपथके व पथनाट्य कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. 9 रोजी तालुक्यातील मुख्यालयी लोगो लावण्यात येणार आहे. 15 ऑगस्ट रोजी तालुक्यातील एन. सी.सी. व एन. एस एस. शाळा महाविद्यालय यांची प्रभात फेरी आयोजित केली जाणार आहे. 10 ते 12 ऑगस्ट याकालावधीत निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा होणार आहे.
सर्व शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम दिनांक 12 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. दिनांक 9 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट रोजी सर्वच शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम घेतली जाणार आहे. तर दिनांक 9 ऑगस्ट रोजी संविधान स्तंभ उभारले जाणार आहे. वारसा स्थळ पुरातत्व दत्तक योजनेअंतर्गत दिनांक 9 ऑगस्ट रोजी तालुक्यातील सर्वच ऐतिहासिक, पुरातन व महत्वाच्या वारसास्थळे यांची जपणूक करण्यासाठी संस्थांना दत्तक देण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले .