साहित्यसंपदा समूह व तेजस्विनी फाऊंडेशन तर्फे स्वच्छता मोहीम

। कुसुंबळे । वार्ताहार ।
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून साहित्यसंपदा समूह सामाजिक व सांस्कृतिक फाऊंडेशन पेण तसेच तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाऊंडेशन अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण कार्यक्रम अलिबागमध्ये पार पाडण्यात आला. या उपक्रमाची सुरूवात दीप्ती कॉटेजमधील पर्यटकांना फुलझाडांचे रोप भेट देऊन वृक्षारोपणाने झाली. सदर प्रसंगी साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे, तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाऊंडेशन रायगड संस्थापिका जिविता पाटील, जयश्री पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.पर्यावरणावर आधारित संदेशपर कविता सादर केल्या. एक आदर्श नागरिक या नात्याने आपली नैतिक जबाबदारी समजून पर्यटनास आलेल्या पर्यटकांनी परिसर स्वच्छ ठेवावे असे आवाहन जिविता पाटील यांनी पर्यटकांना केले.
पर्यावरण संवर्धन, जनजागृतीसाठी अलिबाग मधील समुद्र किनार्‍यावर पर्यटकांना पर्यावरणाचे महत्व सांगणार्‍या फलकांद्वारे संदेश देण्यात आला .
पर्यटकांसोबत खाद्य पदार्थ विक्रेत्यांनीही या चळवळीत सहभागी होऊन पर्यटकांनी कचरा इकडे तिकडे न टाकता जास्तीत जास्त कचराकुंडीचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले. जात धर्म पंथ यांच्या पलीकडे जाऊन आपली एकच पृथ्वी असून तिचा पर्यावरण समतोल राखला जावा यासाठी सगळ्यांनी एकोप्याने काम करण्याची गरज असल्याचे मत वैभव धनावडे यांनी व्यक्त केले.
विशेष बाब म्हणजे युवापिढीने सदर उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदविला.पर्यटक म्हणून आपली ही जवाबदारी, एकच पृथ्वी मानवा जाण ही गोष्ट खरी, झाडे लावा ,झाडे जगवा ब्रीद हे पाळू,लावून एक रोपटे ग्लोबल वॉर्मिंग टाळू असे संदेश देणारे फलक दर्शवून हितार्थ पाटील बालक चर्चेचा विषय बनला. कविता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश टोपले,अनन्या पालोदे,शरयू पाटील,अक्षता पाटील यांनी अलिबाग किनार्‍यावर स्वछता मोहीम राबवली. किनार्‍यावर पडलेल्या प्लास्टिक बाटल्या आणि प्लास्टिक कचरा एकत्रित केला गेला.त्यांच्या ह्या कृतीचा परिणाम पर्यटकांच्या मनावर होऊन काही पर्यटक सुद्धा मोहिमेत सहभागी झाले. स्थानिक व्यक्ती, खाद्य पदार्थ विक्रेते पर्यटक, विक्रेते,कॉटेज व्यावसायिक यांच्या एकत्रित उपक्रमातून समाजात नक्कीच बदल होऊन पर्यावरण संवर्धनात सगळ्यांचा मोलाचा हातभार लागेल अशी आशा प्रत्येक मनात निर्माण करून उपक्रमाची सांगता झाली.

Exit mobile version