“मुंबईत बसून हवेत गोळीबार करू नका”; संजय राऊतांचा आपल्याच पक्षाला टोमणा!

। मुंबई । वृत्तसंस्था ।
शिवसेना खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत हे नेहमीच विरोधकांवर, टीका करताना दिसतात. बरेचदा त्यांनी भाजपावर टीका केल्या असून, मध्येच महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन मित्र पक्षांना देखील लक्ष्य केल्याचं दिसून आलं आहे. पण आता संजय राऊतांनी चक्क आपल्याच पक्षाच्या सरकाराला कानपिचक्या दिल्या आहेत. “सरकारने मुंबईत बसून हवेत गोळीबार करू नये”, असं राऊत म्हणाले आहेत. तसेच, “खरमरीत पत्र वगैरेच्या भानगडीत पडू नका, काही होत नाही”, असं देखील राऊतांनी ऐकवलं आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेचा निषेध करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ३८ लोकांवर कर्नाटक सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. तसेच, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी चालवली आहे. यावर संजय राऊतांनी आक्षेप घेत आपल्याच पक्षाच्या सरकारला सुनावलं आहे.

भाजपाशासित राज्यात देशद्रोह स्वस्त
भाजपाशासित राज्यात देशद्रोह स्वस्त झाल्याचं यावेळी राऊत म्हणाले. “बेळगावमध्ये आजही महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते तुरुंगात आहेत. त्यांचा गुन्हा एवढाच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर त्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केलं. तुम्ही गुन्हे दाखल करू शकता, पण त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. शिवाजी महाराजांच्या अपमानाचा निषेध करणं हा भाजपाची सत्ता असलेल्या राज्यात देशद्रोहासारखा गुन्हा होऊ शकतो का? भाजपाशासित राज्यात देशद्रोह स्वस्त झालाय. काहीही झालं की देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो”, असं राऊत म्हणाले आहेत.

Exit mobile version