राज्याचे राजकारण भाजपने गढूळ केले: संजय राऊत

। मुंबई । प्रतिनिधी ।

राज्याच्या राजकारणात सध्या कटुता आणि द्वेष दिसून येतो. महाराष्ट्राचे राजकारण याआधी असे कधीच नव्हते. राज्याच्या राजकारणात कटुता आणि विष पेरण्याचे काम भाजपने केले, राज्याचे राजकारण भाजपने गढूळ केले आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर घणाघात केला आहे.

सध्या शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर संजय राऊत यांनी मत व्यक्त केले. ते म्हणले, शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्यासाठी त्यांच्याकडे अनेक संस्था आहेत. राजकीयदृष्ट्या ते एकत्र आले किंवा नाही, याची माहिती नाही. मात्र, आजही शरद पवार त्यांच्या पक्षाच्या संघटनासाठी आणि बळकटीकरणासाठी काम करत आहेत. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे सर्व पक्षांचा बांधणीसाठी जिवाचे रान करत आहेत. ते एकत्र आले असतील तर ते त्यांच्या संस्थेच्या कामासाठी आले असतील, असेही ते म्हणाले. मात्र, कोणी एकत्र आले किंवा दुरावा निर्माण झाला तर त्याचा संबंध थेट राजकारणाशी जोडला जातो. मात्र, राजकारणाव्यतिरिक्तही नाती, जिव्हाळा असतो. तो जपला तर त्यात काय गैर आहे. राज्याचे राजकारण भाजपने गढूळ केले आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

Exit mobile version