। मुंबई । प्रतिनिधी ।
धनंजय मुंडे हे अजित पवार गटाचे मंत्री आहेत. परंतु, खुलासा करायला त्यांना दिल्लीत जावं लागतं, अशी टीका शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते, संजय राऊत यांनी केली आहे. तसेच, एकनाथ शिंदेंवर ईडीची टांगती तलवार, ते मंत्रीपद सोडणार नाहीत, असेही संजय राऊत म्हणाले.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र वार्यावर टाकून नेहमी फिरत असतात. आधी दावोसला होते, आता दिल्लीत प्रचारासाठी गेले आहेत. उद्या आणखी कुठे तरी जातील. महाराष्ट्राची जबाबादारी आपल्यावर पडलेली आहे, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. परंतु, ते स्टार प्रचारक आहेत, महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाने जागा जिंकल्या आहेत, त्याचे श्रेय फडणवीसांना दिले जात आहे. आणि महाराष्ट्राचाच फॉर्म्युला दिल्लीत वापरला तर प्रचार न करताही भाजप जिंकेल. परंतु, दिल्ली हे लहान राज्य असून केंद्रशासित आहे. त्यामुळे ते दयाबुद्धीने विचार करू शकतात.
तसेच, एक मंत्री म्हणून आपापल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यात लोकांचा प्रश्न सोडवण्याचा त्यांचा अधिकार आहे. त्यात मला चुकीचे काही वाटत नाही. एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत फिरावं ते ही मंत्री आहेत. परंतु, ते रुसून बसले आहेत असे मला कळले आहे. गणेश नाईक यांनी दोन पक्ष बदलले आहेत. एकनाथ शिंदे यांनी एकच पक्ष बदलला आहे. जेव्हा एकनाथ शिंदे आणखी बदलतील त्यांच्या वरिष्ठपदावरून त्यांच्यात स्पर्धा होईल, असेही संजय राऊत म्हणाले.
पोलिसांवर दबाव
धनंजय मुंडे हे अजित पवार गटाचे मंत्री आहेत. परंतु, खुलासा करायला त्यांना दिल्लीत जावं लागत आहे. त्यांच्या पक्षाचे राष्टीय अध्यक्ष मुंबई, बारामतीत आहेत. परंतु, त्यांच्या पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातो ही महाराष्ट्राची अवस्था आहे. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात मिलीभगत आहे. कुणाचा काय संबंध हे अजित पवार नाही तर न्यायालय आणि पोलीस सांगतील. याचा अर्थ तुम्ही पोलिसांवर दबाव आणत आहात. तुम्ही एखाद्याला क्लीन चीट देत आहात ज्याच्याविरोधात रोष आहे. अजित पवार ज्या प्रकारची भाषा वापरत आहेत त्यावरून तुम्ही अप्रत्यक्षपणे न्यायव्यवस्था, पोलिसांवर आणि या प्रकरणात जे न्याय मागत आहेत त्यांच्यावर दबाव आणत आहेत, असे संजय राऊत यांनी नमूद केले.
एकनाथ शिंदे नाराज आहेत की नाही हे त्यांनी सांगायला पाहिजे, आपण कसे सांगणार त्याबद्दल. ज्या अर्थी ते मंत्रीपदाला चिकटून बसले आहेत त्या अर्थी ते नाराज नाहीत. त्यांना बिनखात्याचे मंत्री केले तरी ते मंत्रीपद सोडणार नाहीत आणि मी नाराज आहे असे कधीच बोलणार नाहीत. तेवढी हिंमत लागते. कारण त्यांच्या डोक्यावर ईडी आणि तपासयंत्रणांची टांगती तलवार आहे.
– संजय राऊत,
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते